पंजाबी गायक शुभदीप सिंह ऊर्फ सिद्धू मूसेवाला यांची 29 मे 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू त्यांच्या आई-वडीलांचा एकलुता एक मुलगा होता. त्यामुळे त्यांच्या वयस्कर आई-वडीलांनी एवढ्या संपत्तीचे काय करायचे म्हणून या वयात कृत्रिम गर्भधारणेद्वारे मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. भारतात एवढ्या जास्त वयात सरोगसी मदरचा कायदा परवानगी देत नाही. म्हणून त्यांनी आयव्हीएफ ( IVF ) तंत्राद्वारे लंडनमध्ये जाऊन कृत्रिम गर्भधारणा केली. त्यानंतर भारतात येऊन बठिंडा येथील हॉस्पिटलमध्ये सिद्धू यांच्या 58 वर्षीय माता चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. वाहेगुरुच्या आशीर्वादाने शुभच्या छोट्या भावाला आमच्या पदरात टाकले आहे अशी प्रतिक्रिया सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी दिली आहे. या वयात मुलाला जन्म घातल्याने सिद्धूच्या वयस्कर आई-वडीलांना पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यांना देखील सामोरे जावे लागले आहे. या निमित्ताने पुन्हा सरोगसी कायदा चर्चेत आला आहे. काय आहे हा कायदा ? आणि त्याचे सामाजिक परिणाम काय ते पाहूयात….
बॉलिवूडमध्ये प्रिती झिंटा सारख्या अभिनेत्रीने 46 वयात सरोगसी तंत्राने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तर करण जोहर, तुषार कपूर हे सरोगसी मदर तंत्राने सिंगल पॅरंट बनले आहेत. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी त्यांच्या ईशा अंबानी ( Isha Ambani ) आणि आकाश अंबानी ( Aakash ambani ) या जुळ्या मुलांना परदेशात या कृत्रिम गर्भधारणेने जन्म दिला आहे. तर इशा अंबानी हीने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत आपल्या जुळ्या मुलांनाही IVF तंत्राने परदेशात अमेरिकेत जन्म दिलेला आहे. भारतात हा सरोगसी मदर हा कायदा कठोर आहे. कारण भारता सारख्या गरीब देशात सरोगसी मदर या कायद्यानूसार गर्भाशय भाड्याने घेताना महिलांचे शोषण होऊ नये तसेच यात पैशांचा व्यापार होऊ नये, कायद्याचा गैरवापर होऊ नये या उदात्त हेतूने हा कायदा कठोर केलेला आहे.
सलमान खान आणि प्रिती झिंटा तसेच राणी मुखर्जी यांचा ‘चोरी चोरी, चुपके चुपके’, आयुष्यान खुराणा याचा ‘विकी डोनर’ सारख्या हिंदी बॉलिवूड चित्रपटातून सरोगसी आणि कृत्रिम गर्भधारणा, स्पर्म बँक असे विषय आपल्याकडे चित्रित केले गेले आहेत. सरोगसी मदर या तंत्राने अमेरिकेतील नब्रास्का राज्यात 61 वर्षांच्या आजीने तिच्या समलैंगिक विवाहित मुलासाठी नातवाला जन्म घातल्याची घटना काही वर्षांपूर्वी खूपच चर्तेत आली होती. आपल्या येथे समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेली असली तरी कायद्याने समलैंगिक जोडप्यांना सरोगसी मदर किंवा in vitro fertilization ( IVF ) ची परवानगी दिलेली नाही. अलीकडेच दक्षिणेकडील एका समलैंगिक जोडप्याने मुलाला जन्म दिल्याची एक आश्चर्यकारक घटना चर्चेत आली होती. परंतू या समलैंगिक जोडप्यांपैकी एकाला गर्भाशय असल्याचे म्हटले जात होते. तर हा सरोगसी कायदा भारतात नेमका कसा आहे आणि जगात हा कायदा कशाप्रकारची परवानगी देतो ते पाहूयात…
1) पारंपारिक सरोगसी –
सरोगसीचे दोन प्रकार आहेत. पारंपारिक सरोगसी आणि गर्भकालीन सरोगसी असे हे दोन प्रकार आहेत. पारंपारिक सरोगसीत वडीलांच्या किंवा दात्याच्या ( डोनर ) शुक्राणूचे मिलन सरोगेट आईच्या अंडबिजाशी केले जाते. नंतर डॉक्टर छोट्या सर्जरीने हा कृत्रिमरित्या फलीत झालेला गर्भ सरोगेट महिलेच्या गर्भाशयात टाकतात आणि सरोगेट आईच्या गर्भातच भ्रुणाची वाढ होते. सरोगेट माता त्या गर्भाला नऊ महिने आपल्या गर्भाशयात वाढविते. या प्रकारात सरोगेट आई हीच बाळाची जैविक माता असते. जर या प्रकारात पित्याच्या शुक्राणूचा वापर करता येत नसेल तर पुरुष दात्याच्या शुक्राणूंचा उपयोग देखील करता येतो. अशा प्रकरणात जोडप्यातील पिता अनुवांशिक रुपाने बाळाचा खरा पिता नसतो.
2) गर्भकालीन सरोगसी ( Gestational surrogates ) – यात सरोगट आई अनुवांशिक रुपाने बाळाशी जुळलेली नसते. यालाच जेस्टेशनल सरोगसी म्हणतात. यात आईच्या अंडबीजांचा वापर गर्भफलित करण्यासाठी होत नाही. ती केवळ आपले गर्भाशय भाड्याने देऊन दुसऱ्या पालकांच्या बाळाला जन्म देते. म्हणजेच ती या बाळाची बायोलॉजिकल मदर नसते. जेस्टेशनल सरोगसीत पित्याचे शुक्राणू आणि आईच्या अंडबीजाचे सरोगेट आईच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले जात असते. IVF तंत्राचा वापर पारंपारिक सरोगसीत देखील केला जातो.
भारतात सर्व आयव्हीएफ केंद्रात जेस्टेशनल सरोगसी ( Gestational surrogates ) अधिक प्रचलित आहे. कारण पारंपारिक सरोगसीत संबंधित महिलाच बाळाची जैविक आई असते. त्यामुळे यातून नंतर कायदेशीर गुंतागंत होण्याचा धोका अधिक असतो.
परोपकारी सरोगसी आणि व्यावसायिक सरोगसी हे दोन प्रकार आहेत.
परोपकारी सरोगसी – जेव्हा एखादं जोडपे कोणा सरोगसी महिलेला स्वत:जवळ राहायला आमंत्रित करते तेव्हा सरोगट महिला कोणी नातेवाईक किंवा अनोळखी व्यक्ती देखील असू शकते. या प्रकरणात दाम्पत्याला सरोगट आईचा सर्व खर्च करावा लागत असतो.
व्यावसायिक सरोगसी – या प्रकारात सरोगट आईला जन्म देण्यासाठी आर्थिक मोबदला दिला जातो. नवीन कायद्यानूसार आता कमर्शियल सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे.
नवीन सरोगसी कायद्यानूसार सरोगसी ( विनियमन ) अधिनियम ( Surrogacy (Regulation) Act, 2021 ) अनूसार केवळ विवाहित जोडपीच सरोगसीचा वापर करु शकतात. कोणताही एकटा पुरुष सरोगसीचा लाभ घेऊ शकत नाही. एकटी महिला मात्र या कायद्याचा वापर करु शकते. परंतू ती घटस्फोटीत, विधवा किंवा 35 ते 45 वयोगटातील असावी. समलैंगिक व्यक्तींना भारतात सरोगसीचा वापर करण्यास मनाई आहे. आधी असा कायदा नव्हता. कारण करण जोहर आणि तूषार कपूर यांनी सरोगसीच्या मदतीने लग्न न करता बाप झाले आहेत. हा कायदा पुरुषांवर अन्याय करणारा असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. महिलांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे हजारो पुरुष लग्नाविना आहेत. सिंगल पुरुषांनाही पितृत्वाचा आनंद घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे हा कायदा अन्यायकारक असल्याचे म्हटले जात आहे. घटनेच्या कलम 14 आणि 21 चे हे उल्लंघन आहे असे या कायद्याला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवीन कायद्याप्रमाणे केवळ नि:संतान दाम्पत्याला या सरोगसीचा लाभ मिळण्याचा अधिकार आहे. त्याचे वय देखील 25 ते 50 दरम्यान असायला हवे आहे. तसेच त्यांनी कोणतेही दत्तक मुल घेतलेले नसावे अशी अट घातलेली आहे. कोणत्याही महिलेला ती विधवा किंवा घटस्फोटीत असेल किंवा तिचे वय 35 ते 45 दरम्यान असेल तरच महिलांना या सरोगसीचा आधार घेता येतो. ज्या दाम्पत्याला सरोगसीने मुल हवे आहे त्यांना विशेष सरकारी वैद्यकीय समितीशी संपर्क करुन त्यांची मंजूरी घ्यावी लागते. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दहा वर्षांचा तुरुंगवास आणि 25 लाखांचा दंड आहे. जर जोडप्याचा बाळाच्या जन्मापूर्वीच मृत्यू झाला तर बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी या दाम्तत्याने नॉमिनी केलेल्या व्यक्तीकडे असणार आहे. सरोगेट मातेवर या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी नाही.
बॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि त्याचे पती निक जोन्स यांनी सरोगसीच्या मदतीने आई आणि वडील झाले आहेत. अभिनेत्री प्रिती झिंटा आणि जीन गुडईनफ हे दाम्पत्य देखील सरोगसीने आई-वडील झाले आहेत. सनी लियोनी हीने आधी दोन मुलांना दत्तक घेतले होते. नंतर ती सरोगसीने दोन मुलांची आई बनली आहे. निर्माता करण जोहर आणि अभिनेता तूषार कपूर सरोगसीने सिंगल फादर बनले आहेत. एकता कपूर देखील या तंत्राने सिंगल मदर बनली आहे.शाहरुख खान आणि गौरी खान सरोगसीच्या मदतीनेच साल 2013 मध्ये अबराम या मुलाला जन्म दिला आहे.
ज्यांना IVF तंत्राने कृत्रिम गर्भधारणा करण्यात अडचण आली आहे ते गर्भधारणेसाठी सरोगेट मदरचा विचार करतात. ज्या जोडप्यातील मातेला वारंवार गर्भपात किंवा मृत बाळांचा जन्म झाला असेल त्यांना सरोगसीचा पर्याय वापरा येतो. ज्या मातांना काही वैद्यकीय परिस्थितीमुळे गर्भधारणा करणे प्राणघातक ठरु शकते किंवा गर्भ टिकून राहत नाही ते देखील गर्भधारणेसाठी सरोगसीचा विचार करतात.
हृदयरोग
किडनीचा आजार
ल्युपस
सिस्टिक फायब्रोसिस
कर्करोग
गंभीर मधुमेह
प्रीक्लेम्पसियाचा इतिहास
अशेरमन सिंड्रोम
उपचार न होणारे गर्भाशयाचे आजार
गर्भाशयात विकृती
सरोगेट गर्भधारणेत महिला बाळाची बायोलॉजिकल म्हणजेचे जैविक माता असते, तरीही, यात महिलेच्या अंडबिजाचे फलन झालेले असते.अमेरिकमध्ये सरोगसी गर्भधारणा पारंपारिक सरोगसीच्या पेक्षा कायदेशीरदृष्ट्या कमी क्लिष्ट आहे. कारण दोन्ही पालकांचे बाळाशी अनुवांशिक नाते असते. त्यामुळे पारंपारिक सरोगसी पेक्षा गर्भधारणा सरोगसी अधिक सामान्य झाली आहे. दरवर्षी सुमारे 750 बाळांचा जन्म गर्भधारणा सरोगसी तंत्राने केला जातो.
भारतातील सरोगसी कायद्यानुसार केवळ विवाहित जोडपे सरोगसीद्वारे पालक बनू शकतात. या जोडप्यामध्ये, पुरुषाचे वय 26 ते 55 वर्षे आणि महिलेचे वय 23 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे.
भारतात अविवाहित जोडपी किंवा तरुणी सरोगसी माता बनू शकत नाहीत. भारतातील सरोगसी कायद्यानुसार अविवाहित मुली सरोगसीद्वारे माता होऊ शकत नाहीत.
भारतात सरोगसीद्वारे केवळ विवाहित जोडपीच पालक होऊ शकतात. सरोगसीचा गैरवापर होऊ नये यासाठी भारतात कठोर कायदा तयार केलेला आहे. त्यानुसार विधवा, घटस्फोटित महिला किंवा LGBTQIA+ जोडपी सरोगसीसाठी पात्र ठरत नाहीत.
भारतीय सरोगसी कायद्यानुसार कोणतीही परदेशी महिला सरोगसीद्वारे आई होऊ शकत नाही. परदेशी लोकांकडून सरोगसीचा गैरवापर केला जाऊ शकतो. व्यावसायिकरित्या सरोगसीचा गैरवापर होऊ शकतो असा संशय असल्याने परदेशी व्यक्तीला भारतात सरोगसी कायद्यानूसार मनाई आहे. भारतीय वंशाच्या व्यक्ती ( PIO ) ज्या विवाहित आहेत आणि परदेशात राहतात त्या मात्र सरोगसीसाठी पात्र आहेत.
कोणतीही महिला केवळ एकदाच सरोगेट मदर बनू शकते. भारतीय कायद्याप्रमाणेएखादी महिला विवाहित असेल आणि तिला दोन मुले असतील तरच ती महिला सरोगसी मदर बनू शकते. ती कोणतेही व्यसन करणारी नसावी आणि वैद्यकीयदृष्ट्या ती फिट असावी.
भारत सरकारच्या मते भारतासारख्या विकसनशील देशात सरोगसीचा गैरवापर केला जाऊ शकतो. सरोगसीचा व्यापार होऊन गर्भाशयाचा बाजार मांडला जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने या नव्या कायद्याद्वारे सरोगेट मातेचे आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कायद्याने सरकारने मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यात स्थायी आणि प्रेमळ कुटुंब असणे याला अधिक महत्व देण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरोगसी संदर्भात अनेक याचिका दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारने सरोगसीच्या कायद्यात दुरुस्ती केली आहे. आता जर दाम्पत्य कोणत्या तरी आजाराने पिडीत असेल तर डोनर या जोडप्याला अंडबिज किंवा शुक्राणू ( स्पर्म ) देऊ शकणार आहेत. केंद्राने आरोग्य मंत्रालयाच्या नियमात बदल केला आहे. आधीच्या नियमात सरोगसी तंत्राने बाळ हवे असणाऱ्या जोडप्याजवळ अंडबिज किंवा शुक्राणू हवेत असे म्हटले होते. यावरुन सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सरोगसीद्वारे आई होण्यासाठी दुसऱ्या डोनर महिलेच्या अंडबिजांचा वापर करण्याची परवानगी आधी दिली होती. परंतू केंद्र सरकारच्या या नियमांमुळे सरोगसी कायद्याचा उद्देश्यच विफल होईल अशी भीती सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करीत त्यात सुधारणा केली आहे.
अमेरिकेत देखील वेगवेगळ्या राज्यात भिन्न स्वरुपाचा सरोगसी कायदा आहे. अमेरिकेत देखील गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलांचे शोषण होऊ नये, मुलांची विक्री होऊ नये यासाठी कायदे आहेत. काही राज्यात सरोगसीच्या काही प्रकारांना बंदी आहे. अमेरिकेत सरोगसीचा खर्च एक लाख डॉलरपर्यंत जातो. नंतर डोनरकडून अंडबीज आणि शुक्राणू खरेदीला आणखी 15 हजार डॉलर खर्च होतात. तसेच आयव्हीएफ तंत्रात गर्भधारणेला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल याची काहीही खात्री नसते. अपयश आल्यास पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पुन्हा नवीन सरोगेट मदर शोधणे किंवा आयव्हीएफ नव्याने केल्याने खर्च वाढत जातो. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 15 फेब्रुवारी 2021 रोजी गेस्टेशनल सरोगसी लिगल करण्यात आली आहे. पालक आणि सरोगेट मदर या दोघांना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. तर काही राज्यांनी काही सरोगसीला बंदी लादली आहे. मिशिगन, नेब्रास्का,लुईशियाना, थायलंड, युके, कंबोडिया आणि चीन या देशात सरोगसीला कायद्याने बंदी आहे.
अमेरिकेत सरोगसी मदरची निवड केल्यानंतर काही सरोगेट माता झालेल्या बाळाला स्तनपान करायला तयार होत नाहीत, त्यामुळे करार करताना संबंधित महिला नीट ओळखीची जवळ राहणारी अशी पाहावी लागते. काही सरोगेट मदर दूध काढून पाठवितात.परंतू सरोगट मदर लांब राहणारी असेल तर असे दूध शिपिंग करुन आणण्यात वेळ जातो, गर्भाशय भाड्याने देणार्या काही माता ते बाळ देण्यास नकार देखील देतात. अशा प्रकरणात कोर्टाने बाळाची कोठडी पालकांकडे देऊन करार मोडला म्हणून सरोगेट मदरला दंड देखील ठोठावला आहे.