नवी दिल्ली: लोकसभेत आज राफेल विमान करारावरुन चांगलीच राडेबाजी पाहायला मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी आज राफेल कराराबाबत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांबाबतची कथित ऑडिओ क्लिप प्ले करण्याची परवानगी मागितली. त्याला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला. शिवाय लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी परवानगी दिली नाही.
राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 मुद्दे
- राफेल कराराबाबतच्या मुलभूत प्रश्नांचीही उत्तरंही दिली जात नाहीत, देश उत्तराच्या प्रतीक्षेत आहे
- मी मोदींची मुलाखत पाहिली, ती मुलाखत बनावट, राफेलबाबत संपूर्ण देश मोदींना प्रश्न विचारतोय, मात्र उत्तरं मिळत नाहीत
- राफेलची संख्या 126 वरुन 36 केली, घाईघाईत केवळ 36 विमानांचाच सौदा का केला?
- मनोहर पर्रिकरांना नव्या कराराची माहिती नव्हती, त्यांना नव्या करारातून का वगळले?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला जाताच विमानांची किमत 526 कोटीवरुन 1600 कोटी झाली
- मोदींच्या सांगण्यावरुनच अंबनींना कंत्राट, HAL ने युद्ध जिंकलेली विमानं बनवली, तर अंबानी हे हरलेले उद्योगपती
- अनिल अंबानी हे अपयशी उद्योगपती, त्यांच्यावर 45 हजार कोटींचं कर्ज
- गोवा भाजपचे आमदार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या आवाजातील कथित ऑडिओ टेप, संसद सभागृहात प्ले करण्याची परवानगी द्या. जर परवानगी नसेल, तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे हे मी तुम्हाला वाचूनदाखवतो.
- राहुल गांधींनी ऑडिओ टेप प्ले करण्याची परवानगी मागितली, मात्र अरुण जेटलींचा आक्षेप, राहुल गांधींकडून ट्रान्सस्क्रिप्ट वाचून दाखवण्याची तयारी, लोकसभेत हायहोल्टेज ड्रामा
- राफेल करार म्हणजे दाल में काला वाटत होतं, मात्र इथे संपूर्ण डाळच काळी आहे.