पाण्याच्या बादलीत पडून नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

| Updated on: Aug 12, 2019 | 1:46 PM

नाशिकमध्ये 11 महिन्यांचा तन्मय दीपक भोये खेळताना पाण्याच्या बादलीत पडला, त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.

पाण्याच्या बादलीत पडून नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
Follow us on

नाशिक : चिमुकल्या बाळांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. खेळताना पाण्याच्या बादलीत पडून नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाला (Nashik baby death) प्राण गमवावे लागले.

नाशकातील पंचवटी भागातील हनुमानवाडी परिसरात रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. 11 महिन्यांच्या तन्मय दीपक भोये याचा पाण्याच्या बालदीत बुडून मृत्यू झाला.

तन्मय झोपी गेला असताना त्याची आई दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. दोन लहान मुलांना बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र दोन्ही मुलं टीव्ही बघत बसली आणि त्यातच रमून गेली.

त्यावेळी तन्मय उठला आणि खेळता-खेळता बाथरुमजवळ गेला. पाण्याने भरलेल्या बादलीजवळ तन्मय डोकावून पाहत होता. खेळताना त्याचा तोल गेला आणि तो बादलीत खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत पडला.

तन्मयच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास करता आला नाही. बाळ पाण्यात पडल्याचं समजताच भोये कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर तन्मयला मृत घोषित केलं. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तन्मयच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही फुगा गिळल्याने, झोक्याचा गळफास बसल्याने, पिंपातील पाण्यात बुडून लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना राज्यभरातील विविध भागांतून समोर आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलं खेळत असताना क्षणभरही त्यांच्याकडे दुर्लक्ष न करण्याची गरज व्यक्त होत आहे.