नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ऑरेंज सिटी म्हणून देशातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केलेलं नागपूर शहर सध्या क्राईम सिटी होण्याच्या मार्गावर आहे. याचाच प्रत्यय देणाऱ्या घटना नागपुरात घडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात 4 मे ते 8 जुलै 2019 या दरम्यान नागपुरात तब्बल 19 खुनाच्या घटना घडल्या आहेत. या समोर आलेल्या आकड्यामुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडालेली आहे.
नागपूर हा गुन्हेगारांचा अड्डाच झालेला आहे. येथे चोरी, दरोडे, बलात्कार, क्रिकेट सट्टा, खून यासारखे गुन्हे येथे सतत घडत असातत. पोलिसांनीही यातील अनेक गुन्ह्याचा शोध घेत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पण तरीही येथील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावर आळा बसण्यासाठी पोलीसांकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नुकतेच नागपूर पोलिसांनी एक अॅप लाँच केला आहे. या अॅपचे वैशिष्ट्य़ असे की, नागपूर पोलिसांनी या अॅपमध्ये शहरातील सर्व गुन्हेगारांना डांबून ठेवले आहे. या अॅपमध्ये सर्व गुन्हेगारांची माहिती देण्यात आली आहे. सर्च अॅप म्हणून या अॅपचे नाव आहे.
एका क्लिकवर तब्बल सात लाख गुन्ह्यांनी माहिती यावर तुम्हाला मिळणार आहे. या माध्यमातून नागपूर पोलीस गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या वाढलेल्या गुन्हेगारीमुळे नागपूरकर असुरक्षित आहेत का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.