मुंबई : “चक्रीवादळाने नुकसान झालेल्या नागरिकांच्या खात्यात सोमवारपासून 20 हजार रुपये जमा होतील”, असा दावा मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीच्या आखाडा या कार्यक्रमादरम्यान दिली. ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा या कार्यक्रमात चर्चा झाली. यावेळी सरकारकडून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर विरोधकांकडून माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बाजू मांडली. (Vijay Wadettiwar announces cyclone Compensation)
या चर्चेदरम्यान, मंत्र्यांचा सामाजिक वावर, चक्रीवादळाने झालेलं नुकसान, त्यादरम्यान केलेली पाहणी आणि मंत्र्यांचा लोकांशी येणारा संपर्क या अनुषंगाने चर्चा झाली. कोकणात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली.
“आम्ही कोकण दौऱ्यावरुन आल्यानंतर NDRF चे मदतीचे जे निकष होते, ते आम्ही लगेच बदलले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केलीय की तातडीने 10 हजार रुपये नुकसानग्रस्तांच्या खात्यावर टाकले पाहिजे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, सोमवारपासून 20 हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे पैसे रोख स्वरुपात आहेत. अन्य मदत ही जसे निर्णय झालेत त्यानुसार होईल. पण सोमवारपासून थेट खात्यावर रोख रक्कम जमा होईल”, अशी माहिती मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विरोधी पक्षाच्याही काही सूचना असतात, ते लक्षात घेऊनही निर्णय होतात. माझ्या खात्यामार्फत काही निर्णय घ्यावे लागतात आणि अशा परिस्थितीत मदत ही करावीच लागते, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मुंबईला येताना भाजीपाला नागपूरवरुन आणतो : वडेट्टीवार
कोरोनाबाबत आपण स्वत: कोणती काळजी घेत आहे, याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. “आज धनंजय मुंडे यांना बाधा झाली. प्रत्येकाला भीती आहे. मलाही भीती आहे. मी मास्क कधीच काढत नाही. मात्र सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात वावरताना लोकांशी संपर्क येतोच. लोकांना दूर राहून बोला असं सांगितलं तर त्यांना अपमानजनक वाटतं. त्यामुळे तसं म्हटलं तर रागही येतो. मी मुंबईला जाताना माझा खानसामा सोबत घेऊन जातो, माझा ड्रायव्हर, सिक्युरिटी सोबत घेऊन जातो. मुंबईतला कोणीही माझ्यासोबत ठेवत नाही. बैठका झाल्या की लगेच घरी जातो. भाजीपाला आणि खाण्याचं साहित्यही मी नागपूरवरुन घेऊन जातो, ही काळजी आता सर्वांनी घेण्याची गरज आहे”, असं यावेळी वडेट्टीवारांनी सांगितलं. (Vijay Wadettiwar announces cyclone Compensation)
संबंधित बातम्या
चक्रीवादळग्रस्तांसाठी नियमापेक्षा जास्त मदत, घरासाठी 95 हजारांऐवजी दीड लाख, दोन महिने मोफत धान्य
चक्रीवादळबाधितांसाठी मुख्यमंत्री वाढीव मदतीची घोषणा करण्याची शक्यता