नागपूर : नागपूरमध्ये गाईच्या पोटातून तब्बल 35 किलो प्लास्टिक निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपुरातील अंबाझरी परिसरात घडली. या घटनेमुळे शहरातील अनेकांना धक्का बसला आहे. प्लास्टिक बंदी असतानाही शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होतो. हेच प्लास्टिक आता मुक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे.
गाईच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता. पोटात पिल्लाच्या वाढीसाठी तिनं व्यवस्थित आहार घेणं गरजेचं होतं. पण पोट फुगल्यानं त्या गाईनं खानं बंद केलं. शिवाय त्या गाईची प्रकृती ढासळायला लागली होती. यामुळे गाईला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेलं. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी मयुर काटे यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर गाईच्या पोटातून तब्बल 35 किलो प्लास्टिक, ऐवढंच नाही तर खिळे आणि नटबोल्टंही निघाले. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गाईच्या पोटात कसं गेलं असेल, हाच सर्वात मोठा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी असली तरीही प्लास्टिकचा सर्रास वापर होतोय. हेच रस्त्यावर पडलेलं प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या पिशवीमधील टाकलेलं अन्न गाईला खायला देतात. यामुळेच गाईच्या पोटात प्लास्टिक जाते. अशाप्रकारे प्लास्टिक टाकून गाईच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहन यानिमित्तानं गोरक्षकांनी केलं आहे. हिंदू धर्मात गाईला नैवद्य देण्याची श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या आड कुणीही येत नाही. पण गाईचं आरोग्य जपायचं असेल, तर गाईला शिजलेलं अन्न देवू नका, रस्त्यावर प्लास्टिक टाकू नका, असं आवाहन गोरक्षक करत आहेत.