Explainer | अशी 5 राजकीय घराणी ज्यांच्या कलहाचा कुणाला फायदा? हे गूढ की कुणी रचलेल्या षड्यंत्राचा भाग?

| Updated on: Mar 19, 2024 | 10:47 PM

घराणेशाहीच्या विरोधात बिगुल वाजवून भाजपने प्रचारात आघाडी घेतली खरी. पण, त्याच घराणेशाहीत फुट पाडून आपले राजकारण भाजप यशस्वी करत आहे. राजकीय घराण्यातील मतभेदामुळे प्रत्येक कुटुंबातील एक घटक भाजपला पाठिंबा देताना दिसत आहे.

Explainer | अशी 5 राजकीय घराणी ज्यांच्या कलहाचा कुणाला फायदा? हे गूढ की कुणी रचलेल्या षड्यंत्राचा भाग?
political party
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे खासदार पशुपती पारस हे बडे नेते मानले जातात. पण, जागावाटपामध्ये त्यांच्या मतदारसंघ हिरावून घेतल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, हे कारण जरी वरवरचे वाटत असले तरी त्याच्या मूळ दुसरेच आहे. बिहारनंतर भाजपने आणखी एका पक्षाला सुरुंग लावला तो म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मोठ्या वहिनी आमदार सीता सोरेन यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. राजकीय कुटुंबातील कलहाचा भाजपने फायदा घेतला. ही केवळ दोनच उदाहरणे नाहीत तर महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवार कुटुंबीयही कौटुंबिक कलहाचे बळी ठरले आहेत. बंगालच्या बॅनर्जी कुटुंबातूनही अशीच एक बातमी समोर येत आहे.

पासवान कुटुंबातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

बिहारचे लोक जनशक्ती पार्टीचे नेत रामविलास पासवान हे 2019 मध्ये राज्यसभेत गेले. त्यांच्या पारंपारिक हाजीपूर या मतदार संघातून त्यांनी भाऊ पशुपती यांना उमेदवारी दिली. रामविलास यांना हवे असते तर त्यांनी ही जागा त्यांचा मुलगा चिराग पासवान याला देऊ शकले असते. याच काळात रामविलास पासवान यांचे निधन झाले. चिराग यांनी एनडीएपासून वेगळे होऊन विधानसभा निवडणुकीत नितीश यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली. त्यावेळी पारस संतापले. या निवडणुकीत चिरागने 143 उमेदवार उभे केले. त्यातील 45 उमेदवारांनी जेडीयू उमेदवारांचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

चिराग पासवान ज्यावेळी बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा पशुपती पारस पक्ष चालवत होते. पण, याच पशुपती पारस यांना हाजीपुर मतदार संघातून उमेदवारी नाकारली गेली आणि कुटुंबातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. मात्र, पशुपती यांना दुर्बल समजणे ही भाजपसाठी मोठी चूक ठरणार आहे.

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यांना डावलून जी चूक केली तशीच ही चूक आहे. ज्याचे परिणाम आजपर्यंत समाजवादी पक्ष भोगत आहेत. साहजिकच हे दोघे एकत्र राहिले असते तर ते आणखी मजबूत झाले असते. दोघांच्या भांडणामुळे लोजपाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काका-पुतण्याच्या भांडणात पासवान यांच्या पक्षाचेच नुकसान होणार आहे.

पक्ष अडचणीत असताना आमदारकीचा राजीनामा

बिहारचे मोठे नेते रामविलास पासवान यांच्या पक्षात फुट पडली. त्यापाठोपाठ झारखंड राज्याचे महत्वाचे नेते शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा या ही पक्षात फुट पडली. शिबू सोरेन यांची मोठी सून सीता आणि मुलगा माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यातील वाद पुढे आला. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर पक्षाची सूत्रे आपल्या हाती येतील अशी आशा आमदार सीता सोरेन यांना होती. मात्र, हेमंत यांनी आपली पत्नी कल्पना हिचे नाव पुढे करताच सीमा सोरेन यांचा संताप अनावर झाला. याच संतापातून त्यांनी पक्ष अडचणीत असताना आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची साथ धरली.

महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना

या दोन घटना आताच्या ताज्या असल्या तरी महाराष्ट्रात पूर्वी ठाकरे कुटुंबातही फुट पडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमधून बाहेर पडत राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. सुरवातीची काही वर्ष वगळता हा पक्ष निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व दाखवू शकलेला नाही. त्यामुळेच आता दिल्लीत जाऊन त्यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याची गरज भासली.

अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केला

महाराष्ट्रातीलच दुसरे राजकीय मोठे घराणे म्हणजे पवार घराणे. बारामतीमध्ये राहून देशाचे राजकारण खेळणारे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केला. इतकेच नव्हे तर शरद पवार यांचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित दादा यांनी निवडणूक आयोगाकडून मिळविले. आता लोकसभा निवडणुकीत बहिण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले.

दीदींच्या नाराजीनंतर बबून यांचा सूर मवाळ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबालाही अंतर्गत संघर्षाने घेरले आहे. TMC ने लोकसभा निवडणुकीसाठी 42 उमेदवार घोषित केले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ममता यांचे धाकटे भाऊ स्वपन बॅनर्जी उर्फ ​​बाबून बॅनर्जी यांनी हावडा येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. हावडामधून प्रसून बॅनर्जी यांना तिकीट दिल्याने बाबून नाराज झाले. पण, चिडलेल्या ममता यांनी बाबून यांना लोभी म्हणत संबंध तोडण्याची घोषणा केली. काही वेळा लोक मोठे झाल्यावर लोभी होतात आणि निवडणुकीत अडचणी निर्माण करतात. मला असे लोक आवडत नाहीत अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर दीदींच्या नाराजीनंतर बबून यांनी आपला सूर मवाळ केला आणि माफी मागितली.

देशातील या पाच महत्वाच्या आणि मोठ्या राजकीय घराण्यामध्ये सुरु झालेला कलह नेमका लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कसा उफाळून आला? हे गूढ आहे की कुणी रचलेल्या षड्यंत्राचा भाग आहे. कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या या विसंवादाचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.