मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर पोहोचली (Maharashtra corona update) आहे. गेल्या 24 तासात तब्बल 12 नवे रुग्ण आढळल्याने, कोरोनाचा वाढता कहर महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. नव्याने आढळलेल्या 12 रुग्णांमध्ये मुंबईतील 8, पुण्यातील 2, कल्याणमधील 1 आणि यवतमाळमधील एका रुग्णाचा समावेश आहे. (Maharashtra corona update)
दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आय सी एम आर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे.
मूळचा यवतमाळ येथील रुग्ण जो सध्या मुंबईत भरती आहे, त्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता.
पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षाची पुण्यातील महिला करोनाबाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.
राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण