Republic Day 2019 मुंबई: देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावरील परेडकडे देशवासियांचं लक्ष असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ट्विट करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच मोदींनी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, देशभरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तब्बल 25 हजार सैनिकांचा कडेकोट पहारा राजपथावरील परेडपासून लाल किल्ल्यापर्यंत आहे. यामध्ये महिला कमांडो, विमानविरोधी तोफा आणि अचूक नेमबाजांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीतून 2 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास भारताच्या संविधानाशी जोडला गेला आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. मात्र 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. या दिवशी राजधानीत भारतीय संस्कृती आणि सामार्थ्याचं दर्शन होतं. यंदा प्रजासत्ताक दिनासाठी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सीरिल रामाफोसा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनापूर्वी देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांची घोषणा झाली. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासह नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर
महाराष्ट्रातल्या या 12 जणांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, एकट्या महाराष्ट्राला 12 पुरस्कार