बुलडाणा : ज्या टोळीने बनावट सोने गहाण ठेवून जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेला 28 लाख रुपयांचा चुना लावला होता. त्याच टोळीने आता बुलडाणा अर्बन बँकेलाही 80 लाखांची फसवणूक (Buldana Urban bank fraud) केली आहे. या प्रकरणी बुलडाणा अर्बनने पोलिसांत तक्रार दाखल केली असून या पतसंस्थेत आणखी काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली असून पोलीस (Buldana Urban bank fraud) अधिक चौकशी करत आहेत.
दोन्ही बँकेतून एकूण सोने गहाण प्रकरणात 1 कोटी 7 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यासोबत धातूच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवणारी मशिनसुद्धा चिखलीतून जप्त करण्यात आली आहे.
बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेला सोने गहाण ठेवून 10 कर्जदारांनी 16 कर्ज घेतली होती. या प्रकरणात 10 कर्जदारांनी 28 लाखांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे बँकेतील सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने बनावट सोने खर असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते. या प्रकरणी जिजामाता महिला बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी 9 जणांवर गुन्हे दाखल केले होते. तसेच सोने तपासणारे दीपक वर्मा, संजय मठारकर, मोहन खरात , मनोहर सावळे, कैनियालाल वर्मा, प्रवीण वाडेकर, कास पेटकर यांना अटक करण्यात आली आहे. तर आनंद देशमुख, वैभव मोरे आणि प्रसाद राऊत फरार आहेत.
जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेत सोने तपासणारा आरोपी दीपक वर्मा हा कर्मचारी बुलडाणा अर्बन पतसंस्थेतही नोकरीवर होता. त्यामुळे बुलडाणा अर्बन पतसंस्थेतूनही अश्या प्रकारे याच टोळीने बनावट सोन्यावर कर्ज घेत 79 लाख 87 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले. ज्यामध्ये संजय मठारकर यांनी 28 लाख 65 हजार, प्रकाश वाघ यांनी 19 लाख 52 हजार, प्रसाद राऊत यांनी 15 लाख 52 हजार, आंनद देशमुख यांनी 12 लाख 10 हजार, विकास पेटकर यांनी 4 लाख 45 हजार रुपये अश्या प्रमाणे एकूण 79 लाख 87 हजार रुपयांची बुलडाणा अर्बन पतसंस्थेची फसवणूक झाल्याचे चौकशीत समोर आलं आहे. त्यामुळे बँकेने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही बँकेत सोने तपासून कर्जाचे प्रमाणपत्र देणारा आरोपी दिपक वर्मा याने बनावट सोने गहाण ठेवल्याच्या प्रकरणात असली सोन्याचे प्रमापत्र दिले होते. बुलडाणा अर्बन पतसंस्थेत सोने तपासणारी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्या मशीनमध्ये सोने तपासणी केली जाते. आता या मशिनीतून वाचण्यासाठी आरोपींनी अशी शक्कल लढवली की, चिखली येथील संजय मठारकर यांनी असली सोन्याचा मुलामा धातूने तयार केलेल्या दागिन्यांवर चढवत असे आणि त्या दागिन्याला सोने तपासणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये तपासल्यास ते 80 टक्के सोन्याचे असल्याचे दाखवत होते अशा पद्धतीने सोन्याचा मुलामा चढविणाऱ्या दागिन्यांवर या टोळीने कर्ज घेतले.
जिजामाता महिला बँकेत 28 लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणात नियमित भरणा न केल्यामुळे कर्जदारांना वेळो-वेळी भरणा करण्यासाठी बैंकेतून कर्जदारांना नोटीसा देवून, फोनद्वारे, प्रत्यक्ष भेटून सांगण्यात आले तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तारणांवर ठेवलेल्या सोन्याची तपासणी केल्यानंतर सदर सोने नकली असल्याचे आढळले. या प्रकरणी तक्रार दाखल होवून गुन्हे दाखल झाले आणि चौकशी नंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेतही अश्याचप्रकारे 79 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. मात्र बँकेचे सर्व कर्ज प्रकरण हे इन्शुरन्समध्ये असल्याने कर्जदारांनी घाबरण्याचे कारण नाही असे आवाहनही बँकेने केले आहे.