नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 7 दिवस पूर्ण झाले आहेत. बुधवारी दिवसाच्या सुरुवातीलाच आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. त्यामुळे बॉर्डर बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाली आणि शेतकरी दिल्लीहून नोयडाला येणाऱ्या रस्त्यावरुन बाजूला हटले. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं. संध्याकाळी सर्व शेतकरी संघटनांची एक बैठक पार पडली. त्यावेळी सरकार संघटनांमध्ये फुट पाडत असल्याचा आरोप या शेतकरी संघटनांनी केलाय. आज सरकार आणि शेतकरी संघटनांच्या होणाऱ्या बैठकीत सरकारला 7 ते 10 पानी निवेदन दिलं जाणार आहे. (8th day of farmer’s agitation in Delhi, Farmers’ Association and Congress agitation in Maharashtra today)
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज दिल्लीत दाखल होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर अमरिंदर सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक होणार आहे. तर दुसरीकडे NDAतील भाजपा मित्रपक्ष असलेल्या JJP चे नेते दुष्यंत चौटाला यांनी किमान आधारभूत किमतीला धक्का लागल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
दिल्लीत गेल्या 8 दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे. महाराष्ट्रात आज उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
“भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले चार दिवस बसले आहेत. हे आंदोलन देशातील सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करणार”, असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिला आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्र काँग्रेसनं पाठींबा दिला आहे. त्यासाठी आज राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्यात येणार आहे. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे. त्यात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि कृषी कायद्याला विरोध दर्शनवण्यासाठी आज राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचे आदेश महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक मुख्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अकोला अशा अनेक ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारनं निर्णय घेतला नाही तर एकाही केंद्रीय मंत्र्यांला राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. तर आज राज्यात होणाऱ्या आंदोलनातही स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. आता शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जागर आंदोलनाचं आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या:
8th day of farmer’s agitation in Delhi, Farmers’ Association and Congress agitation in Maharashtra today