नाशिकः आपण आतापर्यंत एक कोटीचा घोडा, 57 लाखांची घोडी, अशा किमती ऐकल्या. मात्र, एक लाख 11 हजार रुपयांची शेळी. वाचूनच धक्का बसला असेल. मात्र, हे खरे आहे. नाशिकमधील माडसांगवी येथे एका शेतकऱ्याच्या अवघ्या चार महिन्यांच्या चार शेळ्या या 1 लाख 44 हजार रुपयांनी विकल्या गेल्या आहेत. बघा, पशुपालन म्हटलं, तर किती पैसा देणारे ठरू शकते. मात्र, या शेळ्यांची किंमत एवढी कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला, तर मग जाणून घेऊयात यामागचे कारण…
आफ्रिकन वंशाच्या….
नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथील शेतकरी बापू बर्वे यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून शेतीपालन सुरू केले आहे. त्याला आता मधुर फळे लागताना दिसत आहेत. नाशिकमध्ये अत्यंत महाग विकणाऱ्या शेळ्या या आफ्रिकन वंशाच्या आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा शेळ्या आणि बोकड पाळण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या शेळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन इतर शेळ्यांपेक्षा जास्त आहे. शिवाय त्यांचा प्रजननासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
आफ्रिकन वातावरण…
आफ्रिकेतून आणलेल्या शेळ्यात अतिशय थंड अशा नाशिकमध्ये कशा काय रमणार, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र, या शेळ्यांसाठी बापू बर्वे यांनी आपल्या घरात चक्क आफ्रिकन वातावरणाची निर्मिती केलीय. त्यामुळे या शेळ्या इथे तातडीने रुळल्या आहेत. त्यांची ठेवण, अंगकाठी ही आपल्या शेळ्यांपेक्षा वेगळी आहे. या शेळ्या पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. बाजारात त्यांची किंमत आपसुकच इतरांपेक्षा जास्त येताना दिसतेय. त्यामुळेच विक्रमी एक लाख अकरा हजारांना एक शेळी विकली गेली. या आगळ्यावेगळ्या व्यवहाराचीही जिल्ह्यात एकच चर्चा होताना दिसत आहे.
5 कोटींचा रावण
देशातील प्रसिद्ध अशा सारंगखेड्याच्या यात्रेत यंदा सर्वाधिक चर्चा होती रावण घोड्याची. अतिशय रुबाबदार अशा या अश्वाने साऱ्यांना भुरळ घातली. तो मारवाड प्रजातीचा असून, त्याला दररोज दूध, हरभरे, गावरान तूप, अंडी, सुका मेवा खाऊ घातला जातो. रावणची उंची 68 इंचय. तो संपूर्ण काळ्या रंगाचा असून एक पांढरा टिळा कपाळावर आहे. रावणमध्ये एका उत्तम अश्वात असणारे अनेक गुण असल्याने त्याची किंमत तब्बल 5 कोटी निश्चित करण्यात आली. या रावणप्रमाणेच नाशिकमधील ही सव्वालाखाची शेळी पाहूनही अनेकांना धक्का बसला आहे.
इतर बातम्याः
12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य
ST Strike|विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; नाशिकमधील 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
शेवटी आईच ती… मांजराच्या पिलाला कुशीत घेऊन कुत्रीने दूध पाजलं! पाहा व्हिडीओ