रत्नागिरी : विध्वंस करुन निसर्ग चक्रीवादळ आता विसावलं आहे. कोकणात लाखो झाडं उन्मळून पडलेत. (Ratnagiri Harne village cyclone) अनेक घरं कोसळली आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दापोली तालुक्यातील हर्णे आणि पाज पांढरी या गावांना बसला आहे. या दोन्ही गावातील 95 टक्के घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जरी जीवितहानी झाली नसली तरी प्रत्येक घरातील काही ना काही नुकसान झालं आहे. कुणाचं छप्पर उडालं, कुणाची भिंत पडली, कुणाची दारं निखळली, कुणाच्या घरात पाणी शिरलं. (Ratnagiri Harne village cyclone)
या दोन गावात क्वचितच असं घर आहे, ज्याला वादळाचा तडाखा बसलेला नाही. काहींचं तर आता संपूर्ण घरच उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे आता जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे.
अशा परिस्थितीत या गावातील आख्खं कुटुंब एका खिडकीमुळे बचावलं. सोसाट्याचा वारा आणि पाऊस अशा परिस्थिती चक्रीवादळ घरात शिरलं आणि छप्पर उडून गेलं. प्रचंड वाऱ्याने घराचा आडोसा कोसळल्यामुळे कुटुंबातील सात जणांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला. तीन महिला, लहान बाळ यांच्यासह घरातील सर्वजण एका भिंतीच्या आडोशाला उभे होते. मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने विध्वंस सुरु केल्याने, नेमकं जायचं कुठं, आणि आधार कशाचा घ्यायचा असा प्रश्न या कुटुंबाला होता.
अशावेळी घराच्या मागे असलेल्या स्नानगृहात अर्थात बाथरुममध्ये जाऊन आडोसा शोधण्याचा निर्णय घरातील पुरुषांनी घेतला. मात्र बाथरुमपर्यंत जायचं कसं, हा प्रश्न होता. पडझडीने दरवाजे बंद झाले. अशावेळी घराची खिडकी या कुटुंबासाठी जीवनाचा मार्ग ठरली.
(Ratnagiri Harne village cyclone)