एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या नवीन वर्षांत एसटीमधील बसेसची कमतरता दूर होणार आहे. कारण आता नव्या वर्षात एसटीमध्ये सुमारे ३५०० साध्या बसेस दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे. नागपूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती आहे. त्यामुळे नव्या वर्षांत प्रवाशांना एसटी वाचून ताटकळत राहावे लागणार नाही. तसेच प्रवासा दरम्यान बसेस नादुरुस्त होण्याच्या प्रकारातूनही प्रवाशांची सुटका होणार आहे.
एसटी महामंडळाच्या साध्या बसेसची संख्या सध्या कमी झाली आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार बसेस आहेत. कोरोना काळापूर्वी साल २०१८ मध्ये एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसेस होत्या.परंतू कोरोना काळातील आर्थिक संकट आणि इतर कारणांनी एसटी महामंडळात अनेक वर्षे नव्या बसेसची खरेदी झालेली नाही,त्यामुळे एसटीतील जुन्या बसेसचे आयुर्मान संपल्याने त्यांना ताफ्यातून काढून टाकले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बसेसची कमतरता जाणवू लागली होती.प्रवाशांना अतिरिक्त बसेस मिळत नसल्याची अडचण पाहून एसटी महामंडळाने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच १३०० बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला. अशा सुमारे साडे तीन हजार बसेस टप्प्या-टप्प्याने एसटी महामंडळात पुढील वर्षी पासून दाखल होणार आहेत.
एसटी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांचा टप्प्या – टप्प्याने विकास करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने आखलेली आहे.काही बस स्थानकांचा पुनर्विकास सरकारच्या पैशातून तर काहींचा पुनर्विकास बीओटी तत्वावर बांधा-वापरा आणि हस्तांतर करा अशा तत्वावर खाजगी विकासकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गेल्या सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एमआयडीसीच्या मदतीने राज्यभरातील १८३ बस स्थानक आणि परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती.त्याला आता गती मिळाली असून, नागपूर येथील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणं बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचे नाव घेतले जाईल असेही भरतशेठ गोगावले यांनी यावेळी सांगितले.