मुंबई: मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू बकर (Abu Bakkar) याला दुबईत अटक करण्यात आली आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट आणि हँड ग्रेनेडचे हल्ले झाले होते. 12 ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिमसह अनेक जण वॉन्टेड आहेत. अबू बकरही 1993 पासून वाॉन्टेड होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
बॉम्बस्फोट केल्यानंतर एके 47 रायफल नष्ट करण्याचं काम अबू बकर याने केलं होतं. पनवेल येथील खाडीत नेऊन एके 47 रायफली त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अबू बकरला गुन्हेगार हस्तांतरण कायद्यानुसार मुंबई आणण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
12 मार्च 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट
मुंबई 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. 12 मार्चला 12 ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी होते. या बॉम्बस्फोटासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणलं होतं. त्यातील केवळ 10 टक्केच आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोटात जीवितहानीप्रमाणे 27 कोटींची वित्तहानीही झाली होती.
या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या स्फोटाचा मास्टरमाईंड आहे. तर आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कय्यूम यांचा समावेश होता.
साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी आहेत. त्यांतील 100 आरोपींना आरोपांनुसार टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.
दोन वर्षांपूर्वी 7 सप्टेंबर 2017 रोजी विशेष टाडा कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना शिक्षा सुनावली. अबू सालेम आणि करिमुल्लाला जन्मठेप, ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली. तर रियाज सिद्दीकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.