नवी दिल्ली: भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अबूधाबीतील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन अर्थात OIC मध्ये निवेदन दिलं. OIC मध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला त्या सहभागी झाल्या. यावेळी केलेल्या भाषणात सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख केलाच, शिवाय दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारलं.
जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सुषमा म्हणाल्या, भारत हा गांधींचा देश आहे, इथे प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते.
पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे, असं त्यांनी नमूद केलं.
“आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं.
याशिवाय दहशतवादाविरोधातील लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांती होतो, अल्लाहच्या 99 नावांपैकी कोणत्याही नावात हिंसा नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक धर्म शांती आणि मैत्रीचा संदेश देतो, असं सुषमा स्वराज म्हणाल्या.
दहशतवाद्यांना पोसणं बंद करा
यावेळी सुषमा स्वराज यांनी आपल्याला माणुसकी वाचवायची असेल, तर दहशतवाद पोसणाऱ्या देशांना कडक संदेश द्यायला हवं, असं नमूद केलं. जे देश दहशतवाद्यांना पैसा पुरवतात, दहशतवादी अड्डे पोसतात, त्यांच्याविरुद्ध कठोर भूमिका घ्यायला हवी असं सुषमा म्हणाल्या.