कराड : कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी (Kolhapur sangli Flood) मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांकडून मदत पाठवण्यात येत आहे. ही मदत सकाळीच मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पोद्वारे रवाना करण्यात आली. मात्र या टेम्पोला कराडजवळ अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईहून कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागांकडे जीवनावश्यक वस्तू घेऊन जात असताना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराडजवळ अपघात झाला. मदत घेऊन जाणाऱ्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या टेम्पोला आयशर ट्रकने धडक दिली.
कोल्हापूर आणि सांगलीतील पूर ओसरल्यानंतर आता सर्व ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कलाकारांकडून 10 ते 12 टेम्पोद्वारे जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना करण्यात आली. यात अन्नपदार्थासह, कपडे आणि औषधांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीने सोशल मीडियाद्वारे पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला अनेकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सुबोध भावे, सई ताम्हणकर यांच्यासह अनेक कलाकार मंडळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होते. ही जमा झालेली मदत संतोष जुवेकर, प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकार घेऊन रवाना झाले आहे.
त्याचबरोबर 32 टन पशुखाद्य देण्यात आलं असून मुळशी टीम एक गाव दत्तक घेणार असल्याचं दिग्दर्शक आणि कलाकार प्रवीण तरडे यांनी सांगितलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पुढाकार घेतला आहे.