मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना काळाबाजार होत असल्याचं समोर आलं आहे. सरकारने अशा अनेक दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे (Ration shops black marketing amid lockdown). आतापर्यंत (19 एप्रिल 2020) अनियमितता आणि नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकानांचं निलंबन करण्यात आलं आहे, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. स्वस्तधान्य दुकानांमध्ये वाटप करताना कमी धान्य देणे किंवा जास्त पैसे घेणे, नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
राज्यातील वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनीच संबंधित कारवाई केली आहे. राज्यातील 6 महसुली विभागात लॉकडाऊनच्या काळात एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकानांचे निलंबन, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
नागपूर विभागात एकूण 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 18 रेशन दुकानांचं निलंबन, तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11 दुकानांवर तर वर्धा जिल्ह्यात 4 दुकानांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची कारवाई नागपूर शहर भागात करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अमरावती विभागात एकूण 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 7 रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. 13 दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 3 दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली आहे. वाशिम जिल्ह्यात 5 दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात 4 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी 2 गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागात 29 रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले.
Ration shops black marketing amid lockdown