मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे लाखो भक्त बाप्पाच्या मूर्तीपासून ते आरास बनवण्यापर्यंत सर्व काही इको फ्रेंडली (Eco Friendly Ganeshotsav) पद्धतीने करण्यावर भर देतात. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Bollywood actor Riteish Deshmukh) आपल्या घरी शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे ही बाप्पाची मूर्ती रितेशने (Riteish Deshmukh Ganpati) स्वत: तयार केली आहे. गणपती (Ganpati) साकारतानाचा एक व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत रितेश एखाद्या मूर्तीकाराप्रमाणे घरातील गणपतीची मूर्ती साकारताना दिसत आहे. गणपती साकारताना त्याने मातीचा वापर केला असून त्याला पिवळा रंगही दिला आहे. त्यानंतर मोठ्या श्रद्धेने त्याने या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
त्याच्या घरातील मूर्तीसोबतच एक मोठा गणपती आणि चिकणमातीपासून बनवलेले चार छोटे गणपती दिसत आहे. यातील दोन गणपती त्याच्या मुलांनी तयार केलेले आहेत.
I made the Ganesha idol at home out of Mud-clay. I want to be responsible towards my environment,hope we can leave a better-cleaner planet for our children. They learn from what they see. wishing you all happiness & prosperity #HappyGaneshChaturthi #ecofriendly #GanpatiBappaMorya pic.twitter.com/qhWBsXdvw1
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 2, 2019
या व्हिडीओसोबत त्याने आपल्या चाहत्यांना एक खास संदेशही दिला आहे. यात रितेशने म्हटलं आहे की, “मी स्वत: माती आणि चिकणमातीपासून घरीच गणपतीची मूर्ती तयार केली आहे. मला निसर्गाच्या संरक्षणासाठी जबाबदार नागरिक व्हायचं आहे. येत्या पिढीला एक स्वच्छ आणि चांगले पर्यावरण लाभावे यासाठी मी हे पाऊल उचलले आहे. तसेच आपली मुलं आपल्याकडे बघूनच शिकतात, हे कायम लक्षात ठेवा असे सांगत त्याने सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.”
रितेशसोबत अनेक बॉलिवूडकरांनी इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. रितेशप्रमाणे छोट्या पडद्यावरील अभिनेता ऋत्विक धजवानी, करन वाही, राकेश बापट यांनीही घरातच गणपती मूर्ती तयार केली आहे.