मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात लगीनघाई सुरु झाली आहे. येत्या 5 जानेवारीला नेहा प्रियकर शार्दुल सिंहसोबत पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार (Nehha Pendse Getting Married) आहे. नेहाने इन्स्टाग्रामवरुन लग्नाआधीच्या विधींचे फोटो शेअर केले आहेत.
डोक्याला मुंडावळ्या बांधलेला नेहाचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर वायरल झाला आहे. चाहत्यांनी नेहाला शुभेच्छा देतानाच तिचं कौतुकही केलं आहे. नेहाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.
मिलानमधील कॅथेड्रलसमोर शार्दुलचा हात धरुन डोळ्यात डोळे घालत असतानाचा फोटो नेहाने ऑगस्ट महिन्यात शेअर केला होता. त्यानंतर नेहाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं.
काही दिवसांतच नेहाने शार्दुलसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं शिक्कामोर्तब केलं. 2020 च्या सुरुवातीलाच महाराष्ट्रीय पद्धतीने आपण लग्न करणार असल्याचं नेहाने नंतर जाहीर केलं होतं.
बिग बॉसच्या घरात हजेरी
नेहा पेंडसे नुकतीच ‘बिग बॉस 12’मध्ये झळकली होती. नेहाने ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही तिने मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. ( Nehha Pendse Getting Married)