मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विवाहबंधनात अडकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. निमित्त ठरलं आहे, ते सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो आणि कमेंट (Sonalee Kulkarni Bridal Photo).
सोनालीने काल इन्स्टाग्रामवर पारंपरिक वेशभूषेतील फोटो शेअर केला आहे. गुलाबी रंगाची काठापदराची साडी, त्यावर सोनेरी वेलबुट्टी, पिवळाजर्द ब्लाऊज, नथ, गळ्यात हार… यासोबत लक्ष वेधून घेत आहे, ते तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र.
आता सिनेतारकांनी मंगळसूत्र घालून फोटोशूट करण्यात नावीन्य ते काय? एखाद्या चित्रपट-मालिकेच्या निमित्ताने व्यक्तिरेखेच्या वेशभूषेत फोटोशूट करण्याची पद्धत नवीन नाही. त्यातच सोनालीने स्टोरीमध्ये ‘तनिष्क ज्वेलरी’ला टॅग केलं आहे, त्यामुळे साहजिकच हे ज्वेलरी फोटोशूट असल्याचं स्पष्ट होतं.
तर…. सोनालीच्या काही चाहत्यांचं तिच्या मंगळसूत्राकडे बारीक लक्ष गेलं. सोनालीने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र उलटं आहे. त्यावरुन ‘अगं ताई, तू उलटं मंगळसूत्र घातलंस’ अशी कमेंट एका चाहतीने केली. त्याला खुद्द सोनालीनेच रिप्लाय केला आहे. ‘लग्नानंतर काही दिवस उलटंच मंगळसूत्र घालतात’.
लग्नानंतर एक वर्ष मंगळसूत्राची वाटी उलट घालण्याची पद्धत काही समाजांमध्ये आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मंगळसूत्राची वाटी सुलट केली जाते.
सोनालीने चाहतीला रिप्लाय देत लग्नबंधनात अडकल्याचे संकेत दिले आहेत खरे, मात्र लग्न झाल्याचं तिने सोशल मीडियावर जाहीर का केलं नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
कुणाल बेनोडेकर नावाच्या तरुणासोबत सोनालीने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे सोनाली कुणालसोबत लगीनगाठ बांधण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता सोनाली गुपचूप विवाहबंधनात अडकल्याच्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे लवकरच समजेल.
Sonalee Kulkarni Bridal Photo