नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य राज्यांमधील पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अंतर्गत जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सिब्बल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Adhir Ranjan Chaudhary’s advice to Kapil Sibbal)
अधीर रंजन चौधरी यांनी कपिल सिब्बल यांना टोला लगावताना काही न करताच बोलणं याला आत्मपरिक्षण म्हणायचं का? असा प्रश्न विचारला आहे. ‘कपिल सिब्बल यांनी यापूर्वीही असंच मत व्यक्त केलं होतं. ते काँग्रेस पक्ष आणि आत्मपरिक्षणाच्या मुद्द्यावर खूप चिंतित आहेत. पण आम्ही त्यांना बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात निवडणुकीत कुठेच पाहिलं नाही’, असा टोला चौधरी यांनी सिब्बल यांना लगावला आहे.
एका माजी केंद्रीय मंत्र्यानं पक्षातील अंतर्गत मुद्दे माध्यमांमध्ये बोलणं चुकीचं असल्याचा सल्ला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना दिला आहे.
अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली.
यापूर्वी कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया, जानेवारीत काँग्रेसला मिळणार पूर्णवेळ अध्यक्ष
वृद्ध मनमोहन सिंगांपासून राहुल गांधींना धोका नव्हता, म्हणूनच सोनियांकडून पंतप्रधानपदी निवड : ओबामा
Adhir Ranjan Chaudhary’s advice to Kapil Sibbal