ठाणे : शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील वाऱ्याचापाडा येथील झोपडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जेवण केले होते. त्या झोपडीचा आता अवघ्या 15 दिवसांमध्ये कायापालट होणार आहे (Sharad Pawar At Adiwasi Pada). जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या पुढाकाराने या छोट्या झोपडीचे घरकुलात रुपांतर होणार आहे (Reconstruction of Adiwasi Hut).
शरद पवार गेल्या 30 जानेवारीला शहापूर तालुक्यातील वाऱ्याचापाडा येथे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या भूमी पूजनासाठी आले होते. त्यानंतर ते वाऱ्याचापाडा येथील डिजीटल शाळेला भेट देण्यासाठी गेले. वाऱ्याचापाड्याच्या सुरवातीलाच असलेल्या एका झोपडीत शरद पवार गेले आणि तिथे त्यांनी आदिवासी महिलेने बनवलेले जेवण केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाऱ्याचापाडा येथील ज्या झोपडीत बसून जेवण केलं, त्या आदिवासी दाम्पत्यांला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश सांबरे, बबन हरणे, हरेश पष्टे यांच्या सहकार्याने घर बांधून देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांधकामासाठी लागणारे साहित्य आणून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली.
आदिवासी दाम्पत्य रामचंद्र खोडके आणि पत्नी कमल खोडके यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा दहावीत तर मुलगी सातवीत शिकत आहे. मोलमजुरी करुन खोडके दाम्पत्य आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांची कुडाची झोपडी आहे. मात्र, यांचे मन खूप मोठे आहे. त्यांनी त्यांच्या हाताने पवारांसाठी जेवण बनवले आणि पवारांनी देखील त्या झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जेवता-जेवता पवारांनी या गरीब कुटुंबाची संपूर्ण माहिती देखील घेतली. आठराविश्व दारिद्र्यात अडकलेल्या या कुटुंबाला राहण्यासाठी घर बांधून देण्याचा निश्चय पवारांनी केला. मात्र, आपल्या नेत्याचा शब्द कानी पडताच जिजाऊ सामजिक संस्थेचे कर्येकर्ते बबन हरणे यांनी आपल्या हाताने नारळ फोडून कामाचा शुभमुहूर्त केला. येत्या अवघ्या 15 दिवसांत घर पूर्ण होईल, असं बबन हरणे यांनी टीव्ही-9 मराठीशी बोलतांना सांगितले.