मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या वेगाने घडामोडी होत आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते एकामागून एक असे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता आणखी एक वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाला रामराम केला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी नाना पटोले तातडीने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
‘या’ तारखेला करणार भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असून भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 15 फेब्रुवारी रोजी अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यावेळीच अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शहा यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे पक्ष प्रवेश होणार असून त्याचवेळी चव्हाण हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, तो नार्वेकर यांनी स्वीकारला.
नाना पटोलेंना लिहीलेल्या पत्रात काय म्हणाले अशोक चव्हाण ?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ‘मी, दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे