पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाका हटवण्याच्या मागणीसाठी आज (16 फेब्रुवारी) कृती समितीकडून आंदोलन करण्यात येत आहे (Agitation Against Khed-Shivapur Toll Naka). कृती समितीकडून टोलनाका परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला आठ ते दहा हजार आंदोलक जमण्याचा दावा केला जात आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. आंदोलनामुळे पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहने रविवारी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वेगळ्या मार्गाने वळवण्यात आली आहेत. तसेच, साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बदल
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधिनियम कलम 33 (1) (ब) नुसार रविवारी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक खालील मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अजवड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील.
कृती समितीची मागणी काय?
खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर होणारी मोठी आर्थिक लूट आणि वाहन कोंडी यामुळे हा टोलनाका पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हटवून तो सातारा जिल्ह्याच्या हद्दीत सुरु करण्यात यावा, अशी मागणी कृती समितीची आहे. त्यासाठी आज टोलनाका परिसरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात संभाजी ब्रिगेडचं उपोषण
खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात संभाजी ब्रिगेडनेही उपोषण केले होते. यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात आलं होतं. खेड – शिवापूरसह पुणे जिल्ह्यातील सर्व टोलनाके तात्काळ बंद करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली होती.
खेड-शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हा, पुरंदर आणि इतर भागातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. टोलनाका प्रशासन या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्याचा आरोप संभांजी ब्रिगेडने केला होता. तसेच, जिल्ह्यात टोलधाड सुरु असून जिल्ह्यातील टोल बंद करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.