अहमदनगर : कोरोनाबाधित महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिल्याची बातमी येऊन 24 तासही उलटले नसताना काळजाला घरं पाडणारी दु:खद वार्ता आली आहे. जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या अहमदनगरमधील ओल्या बाळंतीणीने जगाचा निरोप घेतला. माऊलीने प्राण सोडण्यापूर्वी बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवल्याचं ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. (Ahmednagar Corona Positive Lady dies soon after giving birth to twins)
मूळ मुंबईतील चेंबूरची असलेली महिला अहमदनगरमधील निंबळकला आली होती. त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.
महिलेचे गुरुवारी (28 मे) सिझेरियन करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमरास तिने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. दोन्ही बाळांचे वजन 2 किलो इतके भरले. त्यामुळे कुटुंबासह आरोग्य यंत्रणेत आनंदाची लकेर उमटली. मात्र शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता तिची प्राणज्योत मालवल्याची चटका लावणारी बातमी आली आणि सर्वच हळहळले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने या वृत्ताला दुजोरा दिला.
हेही वाचा : नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान
अहमदनगर जिल्ह्यात आज नवीन 9 रुग्ण सापडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर पोहोचली आहे. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेला एक, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला एक, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला एक, संगमनेरमध्ये दोन, तर निमगावमध्ये (राहाता) चार रुग्ण सापडले. बाधित रुग्णामध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि 4 वर्षीय लहान मुलगी यांचा समावेश आहे.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स https://t.co/M9g63ot33Q
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2020