मुंबई : | 25 फेब्रुवारी 2024 : राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. अर्थमंत्री अजित पवार हे यावेळी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आमंत्रित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून मनोज जरांगे पाटील यांनाही मोठा इशारा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाषा सांभाळावी. आपण काहीही केलं तरी चालेल असे कोणीही समजू नये असा इशारा त्यांनी दिला.
आम्ही कोणाच्या तरी घश्यात काही तरी करतोय असं दाखवलं जातंय. उचलली जीभ लावली टाळ्याला असं विरोधी पक्षाचे वागणं सुरू आहे असा टोला लगावून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘दूध उत्पादक शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करतंय अशी भावना निर्माण करायची हे चुकीचं आहे. ड्रग्स संदर्भात मोठा तपास सुरू आहे. त्या तपासाचे कौतुक करायचं सोडून टीकाच सुरू आहे. पोलीस यंत्रणा खोलात जाऊन तपास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा सर्वानीच चालवली पाहिजे. मराठा आरक्षणाबद्दल राज्यप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. मार्ग काढायचा प्रयत्न केला. जालना येथे गेले. नवी मुंबईला गेले. तरीही शिवराळ भाषा वापरली जात आहे. आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, अधिकाऱ्यांना बोलतानाही त्यांच्याशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमकं कोण करतंय हे पाहणं गरजेचं आहे असे अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाचा आतापर्यंत घेतलेला निर्णय टिकला नाही. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतले. पण, ते कोर्टात टिकले नाही. पण, आता आम्ही बारकाईने लक्ष घातलं आहे. बिहार राज्याप्रमाणे 10 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे 72 टक्के आरक्षण झालं आहे. तरीही काही वक्तव्ये केली जातात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाषा सांभाळावी. कोणीही असं समजू नये की आपण काहीही केलं तरी चालेल. सगेसोयरे बाबत साडे सहा लाख हरकती आल्या आहेत. त्यावर सुद्धा काम सुरू आहे. राज्यात सर्वसामान्यांचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असताना पाठीमागे कोण आहे हे याच्या खोलात जावं लागेल. असे धाडस कसे होते? याच्या मागे कोण आहे यासाठी सरकार योग्य ती भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना विरोधी पक्षाने जे पत्र दिले तो अंतिम आठवड्याचा मसुदा दिला आहे. कोणता मुद्दा घ्यावा ते लक्षात येत नाही. गोंधळले आहेत असा टोला लगावला. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात 10 टक्के आरक्षण देऊन निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची तेवढीच चिंता असेल तर त्यांना सुध्दा पत्र लिहा जे सकाळी येऊन काही काही शब्द वापरतात असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही रोज विकासाची नवनवीन काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.