पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु केला आहे. यावेळी ते या तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी देतील. विशेष म्हणजे अजित पवारांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यात होणाऱ्या सत्काराला नकार दिला आहे.
पवार काका-पुतण्यांनी खैरेपडळ गावापासून आपल्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात केली. यात ते दुष्काळी गावातील चारा छावण्यांना भेटी देत आहेत. तसेच शेतकऱ्यांशीही संवाद साधत आहेत. दोघांनीही बारामतीतील वढणे गावच्या चारा छावणीवर शेतकऱ्यांशी संवाद साधला.
‘पाण्यावर राजकारण नको’
शरद पवार म्हणाले, “पाण्यावरून राजकारण करु नये. कुठे राजकारण करावे आणि कुठे करु नये याचं भान राखलं पाहिजे. तालुक्या तालुक्यात वाद नको. सध्या येथे पुरेसं पाणी मिळत नाही. टँकरच्या खेपा वाढवण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात 120 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी दूध संघांनी टँकरची जबाबदारी घ्यायला हवी.”
बारामती तालुका पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. दरम्यान, 7 जून रोजी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांच्याशी दुष्काळावरील उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहितीही अजित पवार दिली.
मुख्यमंत्र्यांनी सुप्यात शब्द दिला होता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्यातील आपल्या भाषणात या भागाला पाणी देणार असल्याचा शब्द दिला होता. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.