Baba Siddique Death : 15 दिवसांपूर्वी धमकी, फटाक्यांचा आवाज अन्… नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 13, 2024 | 12:56 AM

दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ होती. मात्र तरीही गोळी काचेत घुसली, त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Baba Siddique Death : 15 दिवसांपूर्वी धमकी, फटाक्यांचा आवाज अन्... नेमकं काय घडलं?
Follow us on

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. यावेळी त्यांच्या छातीला एक गोळी लागली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू हा एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाल्याचे बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. तर एक गोळी ही त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्र्यातील खेरवाडी जंक्शन परिसरात हल्ला झाला, त्या ठिकाणी असलेले पथदिवे बंद होते. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही देखील नव्हते. बाबा सिद्दीकींवर तिघांनी हल्ला केला. त्यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाला लागली. तसेच दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ होती. मात्र तरीही गोळी काचेत घुसली, त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर एक महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधले होते. विशेष म्हणजे त्यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दीकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. मात्र, गोळीबारादरम्यान हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

बिश्नोई गँगचा हात आहे का?

आज विजयादशमी असल्याने या परिसरातून देवीच्या मिरवणुका जात होत्या. त्यामुळे या परिसरात वाद्यांचा आणि फटाक्यांचा आवाज होता. याचाच फायदा घेऊन हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी किती वाजता घराबाहेर पडतात, ते कुठे जातात या सर्व       गोष्टींची माहिती हल्लेखोरांकडे होती. तसेच याप्रकरणी बिश्नोई गँगचा हात आहे का? याचाही तपास केला जात आहे. मात्र अद्याप बाबा सिद्दीकी यांची हत्या का करण्यात आली, याची माहिती समोर आलेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.