पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हस्तांदोलन टाळण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर लोणावळ्यातील हॉटेलमालक बुचकळ्यात पडले होते. अजित पवार हॉटेलच्या उद्घाटनाला यायचे नाहीत, अशी समजूत करुन त्यांनी आधी फ्लेक्स काढला, मात्र नंतर तो पुन्हा लावण्यात आला. अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी हॉटेल परिसरात औषध फवारणी करण्यात आली. (Ajit Pawar Program Corona Spray)
लोणावळ्यात एका हॉटेलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार होतं. परंतु अजित पवार कार्यक्रमाला यायचे नाहीत, असं वाटल्यामुळे आधी त्यांचा फोटो असलेला फ्लेक्स काढण्यात आला. पण ते पुण्यातून कोरोना संदर्भातील बैठक घेऊन हॉटेलच्या उद्घाटनाला येत आहेत, हे समजल्यावर पुन्हा फ्लेक्स लावण्यात आला.
दरम्यान, अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी हॉटेल परिसरात औषध फवारणी करण्यात आली. दुबईहून आलेलं पुण्यातील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळलं होतं. अजित पवारांच्या कार्यक्रमामुळे गर्दी होणं साहजिक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी निर्जंतुकीकरणाचा प्रयत्न आयोजकांनी केला.
अजित पवारांचं आवाहन
‘राज्य आणि देशावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने काळजी घ्या. कोणाचा हात हातात घ्यायचा नाही. घरात गेल्यावर हातात हात घ्या. बाहेर कोणाला वाईट वाटलं, तरी चालेल. मात्र कोणाच्या हातात हात देऊ नका’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.
हेही वाचा : कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार
आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पुण्यात मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे मला काळजी वाटत असून यासंदर्भात आयुक्त, जिल्हाधिकारी यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असून पुण्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचं रान करीन, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
अजित पवारांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला. काही ठिकाणी शाळांना सुट्टी देण्याचंत आली आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.
महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात
कोरोनाचे महाराष्ट्रातील पहिले रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या दाम्पत्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांनाही विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. हे दाम्पत्य नुकतंच दुबईहून आल्याचीही माहिती आहे.
संबंधित दाम्पत्य एक मार्चला पुणे विमानतळावर दाखल झालं. तेव्हा त्यांचं थर्मल स्कॅनिंग झालं होतं. मात्र त्यावेळी कोरोनाचं निदान झालं नाही. 6 मार्चपर्यंत हे दाम्पत्य आपल्या घरी होतं. मात्र त्यानंतर काही लक्षणं दिसू लागल्यामुळे महिलेने दवाखान्यात दाखवलं. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली. त्या चाचणीत हे दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळलं आहे.
(Ajit Pawar Program Corona Spray)