उस्मानाबादमध्ये मराठी साहित्य संमेलनाची सांगता, ‘हे’ 20 ठराव बहुमताने मंजूर

| Updated on: Jan 12, 2020 | 7:15 PM

बहुचर्चित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (12 जानेवारी) उस्मानाबाद येथे समारोप झाला. संमेलनाची सांगता करताना मागील काळात ज्या थोर व्यक्तींचं निधन झालं त्यांना आदरांजली देण्यात आली (Marathi Sahitya Sammelan 20 Resolutions).

उस्मानाबादमध्ये मराठी साहित्य संमेलनाची सांगता, हे 20 ठराव बहुमताने मंजूर
Follow us on

उस्मानाबाद : बहुचर्चित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज (12 जानेवारी) उस्मानाबाद येथे समारोप झाला. संमेलनाची सांगता करताना मागील काळात ज्या थोर व्यक्तींचं निधन झालं त्यांना आदरांजली देण्यात आली (Marathi Sahitya Sammelan 20 Resolutions). विशेष म्हणजे संमेलनाची सांगता करताना संयोजकांनी संमेलनात गोंधळ घालणाऱ्या जगन्नाथ पाटील यांचा साहित्य समितीतर्फे संपादक म्हणून काम केल्यानं सत्कार केला. या अखेरच्या दिवशी साहित्य संमेलनाने अनेक महत्त्वाच्या विषयांवर 20 ठराव मंजूर केले आहेत (Marathi Sahitya Sammelan 20 Resolutions).

अखिल मराठी साहित्य संमेलनाचे 20 ठराव :

ठराव क्र. 1 : श्रद्धांजली

गेल्या वर्षभरात मृत्यू पावलेल्या महाराष्ट्रातील व देशातील साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ यांना 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन श्रद्धांजली अर्पण करीत आहे. त्यांत –
भिकू पै आंगले, प्रा. म. सु. पाटील, प्रा. विजय देव, ल. सी. जाधव, मोहन रानडे, अबुरी छायादेवी, डॉ. गो. मा. पवार, गुलबर्गा येथील दयानंद बिराजदार, डॉ. श्रीपाद भट, हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव सायगावकर, प्रकाश सेनगावकर, कादंबरीकार किरण नगरकर, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, अरुण जेटली, डॉ. खुर्जेकर, बी. जी. खताळ पाटील, डॉ. लखन सिंग, लीला मर्चंट, माधव आपटे, विजय सरदेशमुख, प्रा. गिरीश खारकर, हरिहर गोविंद उर्फ नानासाहेब पिंपळगावकर, रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू, कथा लेखक सखा कलाल, गिरीजा कीर, अनिल बळेल, ह. लि. निपुणगे, विष्णू सूर्या वाघ, श्यामराव भोसले, व्यंगचित्रकार विकास सबनीस, अकबर पद्मजी, सुमन बेलवलकर, तुळशीराम बोरकर तसेच कालच दिवंगत झालेले रंगकर्मी डॉ. शशिकांत बर्‍हाणपूरकर या आणि इतर ज्ञात, अज्ञात व्यक्तींना हे संमेलन श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

ठराव क्र. 2:

महाराष्ट्रातील शेतकरी हा आज समाजधुरिणांचा व जाणत्या मंडळींचा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकर्‍यांच्या मुला-मुलींना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटत आहे. तथापि केंद्र व राज्य शासनाची या संदर्भातली अनास्था चिंताजनक आहे. केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांनी संवेदनशीलतेने त्यांच्या प्रश्नाकडे पाहावे आणि शेतकर्‍यांनी केलेले उत्पादन तातडीने खरेदी करुन त्यांना जाहीर केलेला किमान हमीभाव विनाविलंब देण्यात यावा, शेतकर्‍यांचा शेतमाल उत्पादन निघाल्यापासूून किमान चार महिन्यापर्यंत खरेदी करण्यात यावा. त्यात कुठेही खंड पडू नये, अशी कळकळीची मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : नितीन तावडे
अनुमोदक : भास्कर शेळके

ठराव क्र. 3

24 जून 2019 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठावर महाराष्ट्रातील 24 संस्थांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा, मराठी शिक्षण बारावीपर्यंत सक्तीचे करण्याचा कायदा, मराठी भाषाभवन, मराठी विद्यापीठ, मराठी प्राधिकरण अशा सर्व मागण्यांची पूर्तता सरकारने त्वरित करावी अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक : प्रा. मिलिंद जोशी
अनुमोदक : प्रा. उषा तांबे

ठराव क्र. 4

मराठी भाषेची इंग्रजीकडून होणारी गळचेपी थांबविण्यासाठी ज्या प्रमाणे दक्षिण भारतातील राज्यांनी त्यांची मातृभाषा इंग्रजी माध्यमाच्या सी.बी.एस.ई. आणि आय.सी.एस.ई. सारख्या बोर्डांच्या शाळेत शिकविण्याचा कायदा केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पहिली ते बारावी पर्यंत सक्तीने मराठी शिकविण्याचा कायदा शासनाने त्वरित करावा, अशी आग्रही मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक : डॉ. उज्ज्वला मेहेंदळे
अनुमोदक : राजेंद्र मुठाणे

ठराव क्र. 5

मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे वेगाने वाढणारे प्रमाण हा मराठी भाषेच्या व मराठी भाषक समाजाचा चिंतेचा विषय झाला असून या शाळा बंद पडू नये म्हणून प्रयत्न करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन उदासीन दिसते. शासनाने ही उदासीनता झटकून राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणार नाहीत, यासाठी तातडीने कृती योजना आखावी. तसेच मराठी शाळांची मागणी करणार्‍या महाराष्ट्रातील व बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : प्रसाद देशपांडे
अनुमोदक : अशोक बेंडखळे

ठराव क्र. 6

भारतीय राज्यघटनेत नमूद साहित्य, कला, विज्ञान व संशोधन क्षेत्रातील, राज्याच्या विधानपरिषदेवरील नियुक्त्या करताना सत्ताधारी शासन, विधान परिषदेतील त्या जागी राजकीय पक्षांतील उमेदवारांची वर्णी लावतात असे आढळते. त्यामुळे घटनात्मक तरतुदीला हरताळ फासला जातो. ते थांबविण्यासाठी घटनेत नमूद केलेल्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्याच नियुक्त्या व्हाव्यात, अशी मागणी हे साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : प्रदीप दाते
अनुमोदक : बालाजी तांबे

ठराव क्र. 7

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रदेशात मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना धमकी देणार्‍या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तीव्र निषेध करीत आहे.
सूचक : प्रकाश पायगुडे
अनुमोदक : रमेश वसकर

ठराव क्र. 8

सीमावासीय हे मराठी भाषेचे सीमेवरचे रक्षक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपत आहेत. सीमा भागात संमेलने घेऊन ते माय मराठीचा जागर करीत आहेत. परंतु कालच कर्नाटक सरकारने या भागातील मराठी साहित्य संमेलने भरविण्यावर बंदी घातली आहे. कर्नाटक सरकारचा हा निर्णय त्या भागातील मराठी भाषेवर आणि संस्कृतीवर दडपशाहीचा घाला घालणारा आहे. हे साहित्य संमेलन कर्नाटक सरकारचा या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध करीत आहे.
सूचक : डॉ. दादा गोरे
अनुमोदक : रवींद्र केसकर

ठराव क्र. 9

कर्नाटक सीमेवरील मराठी समाज आपली गावे व शहरे महाराष्ट्रात सामील व्हावीत म्हणून आटोकाट प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावे, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील काही गावे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तेरा गावे आपल्या शेजारच्या राज्यातील ग्रामीण भागात झालेला विकास आणि त्यांना मिळणार्‍या सुखसोयी पाहून या राज्यात सामील होण्याची भाषा उघडपणे करीत आहेत. ही महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने शोभा देणारी गोष्ट नाही. सर्वपक्षीय पुढार्‍यांनी त्यांच्या विकासाकडे आणि सुखसोयींकडे आतापर्यंत केलेले दुर्लक्ष आणि सध्या करीत असलेले दुर्लक्ष याची या संमेलनाला चिंता वाटते. सर्वपक्षीय पुढार्‍यांना या संमेलनाद्वारे इशारा असून त्यांनी राजकारण बाजूला ठेवून शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गावांच्या विकासाकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे व युद्धपातळीवर त्यांचे विकासाचे प्रश्न सोडवावेत आणि त्यांना आश्वासित करावे, अशी ठाम मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलन करीत आहेत.
सूचक : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
अनुमोदक : गजानन नारे

ठराव क्र. 10

महाराष्ट्राबाहेर फार मोठ्या प्रमाणात मराठी भाषक समाज आहे. महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्था मराठी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्याशी नियमित संवाद साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या कामी महाराष्ट्र सरकारने आपल्या मराठी भाषा विभागामार्फत सहकार्य करून त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मराठी भाषा विभाग असा स्वतंत्र विभाग उघडावा, अशी मागणी उस्मानाबाद येथील हे साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : डॉ. रामचंद्र काळुंखे
अनुमोदक : डॉ. विद्या देवधर

ठराव क्र. 11

महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या विकासासाठी मराठी भाषा विभाग स्थापन केला आहे. पण बारा कोटी भाषकांच्या विकासासाठी अंदाजपत्रकात जेमतेम तरतूद आहे. त्यात भरघोस वाढ करण्यात यावी, अशी मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : विलास मानेकर
अनुमोदक : प्रा. प्रतिभा सराफ

ठराव क्र. 12

आज समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव निरनिराळ्या क्षेत्रात गंभीर समस्या निर्माण करीत आहेत. झुंडशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असून ही प्रवृत्ती वरचेवर प्रबळ होत असून समाजजीवन गढूळ करीत आहे. याची या संमेलनाला गंभीर चिंता वाटते. राज्य व केंद्र सरकारांनी याची दखल घेऊन या उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक : डॉ. रामचंद्र काळुंखे
अनुमोदक : प्राचार्य भालचंद्र शिंदे

ठराव क्र. 13

महात्मा फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा भिडे वाडा, बुधवार पेठ, पुणे येथे मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. या शाळेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तिचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात केले जावे, अशी मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : सुनिताराजे पवार
अनुमोदक : कपूर वासनिक

ठराव क्र. 14

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राची व महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी भारताच्या निरनिराळ्या राज्यांत महत्वाच्या ठिकाणी महाराष्ट्र परिचय केंद्रे स्थापन केली होती. आता ही परिचय केंद्रे असून नसल्यागत झाली आहेत. म्हणून आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्रांचे पुनरुज्जीवन करावे आणि नसलेल्या सर्व राज्यांतील महत्वाच्या ठिकाणी नव्याने महाराष्ट्र परिचय केंद्रे स्थापन करावीत, अशी आग्रहाची मागणी महाराष्ट्र सरकारकडे हे साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील
अनुमोदक : प्रा. उषा तांबे

ठराव क्र. 15

महाराष्ट्रात साठहून अधिक बोलीभाषा आहेत. त्यातील काही बोली अस्तंगत होत आहेत. बोलीभाषांना उत्तेजन देऊन त्यांचे संवर्धन कसे करता येईल. यासाठी तज्ज्ञांनी समिती नेमावी, अशी मागणी हे साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : पुरूषोत्तम सप्रे
अनुमोदक : अशोक बेंडखळे

ठराव क्र. 16

मराठवाडा प्रदेश दुष्काळग्रस्त आहे. या परिसरात होणारा कमी पाऊस हे दुष्काळाचे कारण असले तरी समन्यायी पाणी वाटपाच्या ठरावानुसार मराठवाड्याच्या हक्काचे 23 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळत नाही. ही उणीव दूर करुन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रहाची मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक : नितीन तावडे
अनुमोदक : डॉ. दादा गोरे

ठराव क्र. 17

उस्मानाबाद परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने उस्मानाबाद येथे तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : रवींद्र केसकर
अनुमोदक : नितीन तावडे

ठराव क्र. 18

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या आणि सध्याच्या विद्यापीठाचे भौगोलिक अंतर लक्षात घेऊन या उपकेंद्राचे रूपांतर स्वतंत्र विद्यापीठात करण्यात यावे, अशी आग्रहाची मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख
अनुमोदक : माधव इंगळे

ठराव क्र. 19

उस्मानाबाद व परिसराच्या विकासासाठी तसेच दळणवळण व व्यापारासाठी अनेक वर्षापासूून बीदर ते टेंभुर्णी या महामार्गाची मागणी जनतेने शासनाकडे केलेली आहे. मात्र त्याकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. तसेच या कामी ठोस पावले उचलली जात नाहीत. स्थानिक जनतेची ही मागणी अग्रक्रमाने पूर्णत्वास न्यावी, अशी कळकळीची मागणी हे संमेलन करीत आहे.
सूचक : बालाजी तांबे
अनुमोदक : श्रीकांत साखरे

ठराव क्र. 20

उस्मानाबाद परिसरातील रहिवाशांच्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परंतु या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झालेली नाही. हे रेल्वेमार्गाचे काम त्वरित सुरू करावे व गतीने पूर्णत्वास न्यावे अशी मागणी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
सूचक : नितीन तावडे
अनुमोदक : डॉ. अभय शहापूरकर