अकोला : अकोल्यात आजच्या दिवसात 12 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने पन्नाशीपार केली आहे. धक्कादायक म्हणजे दोन महिलांचे अहवाल मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. (Akola Corona Patients Increased)
अकोल्यात सकाळी (3 मे 2020) प्राप्त झालेल्या अहवालात 12 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी तिघे जण मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा, तर दोघे जण न्यू भीमनगर भागातील रहिवासी आहेत. तर दोन महिलांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचे अहवाल आज आल्यावर दोघीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.
अकोला जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 झाली आहे. यापैकी 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 11 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर पाच जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. एका रुग्णाने 11 एप्रिलला आत्महत्या केली होती. या रुग्णांमध्ये एका खासगी डॉक्टरचाही समावेश आहे.
अकोल्यामध्ये गेल्या दोन दिवसात 10 ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडले होते. कालच्या दिवसात आढळलेले सहा रुग्ण हे मयत कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील होते. रुग्ण सापडलेले जयहिंद चौक, मेहरे नगर, रवी नगर, शंकर नगर, शिवर, कमला नगर हे भाग सील करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, वऱ्हाडातील पाच जिल्ह्यापैकी एकमेव वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या कडक अंमलबजावणीमुळे ‘कोरोना’ रोखण्यात यश आले आहे. वऱ्हाडातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यासह शेजारील हिंगोली जिल्ह्यात रोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र वाशिम जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर पालनामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे.
VIDEO : Corona | अकोल्यात नियम पायदळी, कोरोनामुक्त रुग्णाला ‘जादू की झप्पी’ देऊन स्वागतhttps://t.co/br5gwOLBs8
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2020