मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हा सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलेब्रिटीजची यादी जाहीर केली. त्यामध्येही अक्षय कुमारचा समावेश होता. अक्षय हा एकमेव असा भारतीय अभिनेता आहे ज्याला फोर्ब्सच्या यादीत जागा मिळाली. अक्षय फोर्ब्सच्या जागतिक यादीत 444 कोटी रुपयांच्या कमाईसोबत 35 व्या स्थानावर आहे. इतकंच नाही तर तो सिनेसृष्टीत सर्वात जास्त कर भरणारा अभिनेताही आहे. मात्र, दरवर्षी कोटींची कमाई करणारा अक्षय पैसे कमावण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणून त्याने लगेच 100 पाउंड (8,535 रुपये) कमवण्याचं चॅलेंज घेतलं.
अक्षय कुमार सध्या त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर आहे. अभिनेत्री आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारचा एका व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला. यामध्ये अक्षय हा खांबावर लटकलेला आहे आणि तो कुठलातरी फिटनेस चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहे. निश्चित वेळेपर्यंत या खांबाच्या सहाय्याने हवेत लटकणाऱ्याला 100 पाउंडचं बक्षीस मिळणार होतं. 100 पाउंडसाठी लटकलेल्या अक्षयचा हा व्हिडीओ शेअर करत ट्विंकलने त्याची खिल्ली उडवली आहे.
ट्विंकलने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ शेअर करताना ”जस्ट हँगिंग इन देअर! फोर्ब्स लीस्टमध्ये नाव येऊनही याला समाधान नाही, त्याला लगेच 100 पाउंडही जिंकायचे आहेत”, असं कॅप्शन दिलं.
सोशल मीडियावर अक्षयचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवर अक्षयचे फॅन्सही मजेशीर कमेंट करत आहेत. ‘पैसे का चक्कर बाबू भैया, पैसे का चक्कर’, अशी कमेंट एका युझरने केली.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, येत्या 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाला त्याचा ‘मिशन मंगल’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय तो सध्या हाउसफुल 4, गुड न्यूज, लक्ष्मी बॉम्ब आणि सूर्यवंशी हे सिनेमे करतो आहे.