बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात परळीमध्ये सर्वधर्मीय 79 वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी या विवाह सोहळ्यात कन्यादान केलं. दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी मुस्लीम समाजातील तीन, तर दुपारी बौध्द धर्मातील 20 वधू-वरांचे विवाह त्या-त्या धर्मातील रितीरिवाजानुसार पार पडले. सायंकाळी गोरज मुहूर्तावर उर्वरित विवाह उत्साहात संपन्न झाले. या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षयकुमार, प्रज्ञा मुंडे, मंत्री महादेव जानकर यांच्यासह खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.
अक्षय कुमार रिल लाईफमधलाच नाही, तर रिअल लाईफमधलाही हिरो आहे हे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं. या सोहळ्यातील सर्व जोडप्यांना त्याने प्रत्येकी एक-एक लाख रुपये दिले. शहीद जवानांसाठी कोट्यवधी रुपयांची मदत करणाऱ्या अक्षय कुमारच्या या मदतीने परळीकर अक्षरशः भारावून गेले. येथील गर्दी पाहता परळी छोटं गाव नसून हे मोठं शहर आहे. एवढ्या मोठ्या एकत्र लग्नाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित जनसुदायासमोर मी पहिल्यांदा आलोय. आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे. सुख-शांती लक्ष्मी यावी असेल असे वाटत असेल तर पत्नी आणि आईची काळजी घ्यावी. मराठी मला खूप चांगली वाटते. इकडे परळीत सामूहिक लग्नाचा दरवर्षी हा कार्यक्रम वर्षातून दोनदा आयोजित करावा, असं आवाहन अक्षय कुमारने केलं.
काही लोक जीवनात केवळ राजकारणच करतात. मात्र मुंडे साहेबांनी आम्हाला समाजकारण करायला शिकवलं. त्यानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. मात्र काही लोक परळीच्या पवित्र भूमीत समारोप करतात. मात्र ही भूमी शुभारंभ आणि सुरुवात करण्याचं ठिकाण आहे. परळीत जेव्हा सुरुवात होते, तेव्हा ते देशभर जाते. जे परळीत समारोप करताच, त्यांचा समारोप झाल्याशिवाय राहत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. रचनात्मक जोड देत राजकारणापलिकडे जाऊन सामाजिक काम करण्याची शिकवण आम्हाला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेली आहे. राज्यात काम करताना हे सूत्र घेऊन राज्य सरकारने काम केले आहे. पंकजाताईंच्या सामाजिक जाणिवाही गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
पंकजा मुंडेंनी वरमाय म्हणून या 79 जोडप्यांचं कन्यादान केलं. यावेळी त्या म्हणाल्या, वरमाय म्हणून सर्व वऱ्हाडी वधू- वरांचे स्वागत करते, मुंडे साहेबांच्या शिकवनुकीनुसार काम करत आहोत… कायम वंचित उपेक्षितांची सेवा करण्याची संधी द्यावी, चांगले, विधायक काम करणारांच्या पाठीशी उभे राहा, अक्षय कुमार यांनी नेहमीच तळागाळातील माणसाच्या पाठीशी उभे राहून काम केले आहे, अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.