चंद्रपूर : सततच्या मानव-वन्यजीव संघर्षाने चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार देखील संतापले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वाघ-बिबट्याची दहशत सुरु आहे. शेतकऱ्यांना वाघ मारण्याची परवानगी आणि बंदुका देण्याची मागणी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आम्ही वाघ आहोत असं शिवसेना नेहमी म्हणते. पण शिवसेनेच्या आमदारांनीच वाघ मारण्याची परवानगी मागितल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
विशेष म्हणजे वाघांच्या संरक्षणाच्या मुद्द्यांवर आतापर्यंत अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने वाघांना मारण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आमदार बाळू धानोरकर यांनी वनविभागाकडे ही मागणी केली. बाळू धानोरकर यांचा मतदारसंघ असलेल्या वरोरा तालुक्यात गेल्या दीड महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झालाय. बिबट्यांच्या हल्ल्यात झालेल्या या मृत्यूंमुळे गावकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. त्यामुळे धानोरकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अर्जुनी गावात एक सभा घेतली आणि मृतांच्या नातेवाईकांना वैयक्तिकरित्या प्रत्येकी 10 हजारांची मदत केली.
सोबतच अर्जुनी गावात 50 शौचालये देखील बांधून देण्याची घोषणा केली. भाषणात त्यांनी वनविभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, वनविभाग जर लोकांचे जीव वाचवू शकत नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांना बंदुकी द्याव्या आणि वाघांना मारण्याची परवानगी द्यावी.
धानोरकर यांची ही मागणी जनतेला दिलासा देण्यासाठी आहे की वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अडचणीत आणण्यासाठी याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.