अंबरनाथ : अंबरनाथमधील एका उच्चभ्रू सोसायटीतील भटके कुत्रे दूर नेऊन सोडणं तिथल्या सभासदांना महागात पडलं आहे (Road side Dog in Ambarnath). कुत्र्यांना मारुन टाकल्याचा आरोप प्राणि मित्रांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत (Road side Dog in Ambarnath).
अंबरनाथ पश्चिमेला मोहन सबर्बिया नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारात नऊ भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. सोसायटीत अस्वच्छता पसरवणं, रहिवाशांच्या मागे धावणं, लॉबीतील सोफे फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यामुळे सोसायटीतील काही सदस्यांनी त्या कुत्र्यांना रिक्षात भरून दूर नेऊन सोडलं. मात्र यानंतर प्राणीमित्रांनी या कुत्र्यांचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोसायटीतील या 9 कुत्र्यांपैकी आठ भटके कुत्रे बाहेर नेऊन सोडण्यात आले होते. त्यापैकी 3 कुत्रे काही दिवसांनी कल्याण-बदलापूर मुख्य मार्गावर सापडले. त्यापैकी 1 कुत्रा जखमी अवस्थेत होता. त्यामुळे सोसायटीच्या सदस्यांनी कुत्र्यांना मारहाण केली असून इतर पाच कुत्रे सापडत नसल्याने त्यांना मारून टाकलं असल्याची भीती सोसायटीतील प्राणीमित्र अर्चना नायर आणि मुकुंद पांडे यांनी व्यक्त केली.
“कुत्र्यांना अशा पद्धतीने बाहेर सोडण्याऐवजी प्राणी मित्रांना विश्वासात घेऊन कुत्र्यांचे निर्बीजीकरण, स्थानांतरण आणि लसीकरण करता येऊ शकतं”, असं मत प्राणी मित्र संस्थेच्या रेखा रेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
याप्रकरणी अंबरनाथ पोलीस सध्या हरवलेल्या पाच कुत्र्यांचा शोध घेत आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत मोहन सबर्बिया सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू घाटे यांना संपर्क साधला असता आम्ही पोलिसांना सगळी माहिती दिली असल्याचे सांगत त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका
वाढीव वीजबिलावरोधात मनसे महिला कार्यकर्त्या आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा