Amboli Water Fall | एकीकडे धुक्याची चादर, दुसरीकडे कोसळणारा धबधबा, बहारदार आंबोली
सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या पावसामुळे निसर्ग नटला आहे.पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेला आंबोली धबधबा कोसळू लागला आहे. आंबोली घाटात धुक्याची चादर पाहायला मिळतेय.
Follow us on
गेले तीन दिवस तळकोकणात पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात तुफान पाऊस कोसळत असल्याने पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेला आंबोली धबधबा कोसळू लागला आहे. आंबोलीतील वर्षा पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेला धबधबा प्रवाहित झाला आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होईल.
याशिवाय आंबोलीत अल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या आंबोली घाटाच्या चारही बाजूला ढगांची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे.
जणू ढग जमिनीवर आल्याचा भास आंबोली घाटात होत आहे. संपूर्ण घाटात ढग खाली आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
सध्या कोरोनामुळे अनलॉकिंग सुरु असलं तरी पर्यटकांनीही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे आंबोली धबधब्यावर सध्या तरी पर्यटकांची गर्दी नाही. कोरोनाच्या फैलावामुळे सिंधुदुर्गातील संपूर्ण पर्यटन बंद आहे.
आंबोलीचा मुख्य पर्यटन हंगाम समजल्या जाणाऱ्या वर्षा पर्यटन हंगामावर याचा परिणाम होणार आहे. पर्यटक कितपत येतील याबाबत येथील पर्यटन व्यवसायिकांना चिंता आहे.
कोरोनामुळे पर्यटकांनी पाठ फिरवल्यास त्याचा मोठा परिणाम येथील पर्यटन व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय हा जिल्ह्यांतर्गत सुरु करण्याची मागणी होत आहे.
जे नॉन रेड झोन आहेत, त्या जिल्ह्यातील पर्यटकांना सिंधुदुर्गात येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.