राजकारणात सध्या विरोध पक्षांना काही स्पेसच उरली नाही अशा महाविजय महायुतीला राज्यात मिळाला आहे. यामुळे विरोधी पक्षांना राजकारण करण्यासाठी वावच राहीलेला नाही. त्यामुळे केंद्रात एनडीएच्या सरकारला पाठींबा देऊन आपला पक्षा वाचविणे एवढेच काम आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हाती राहीले आहे.त्यामुळे ते एनडीएत सहभागी होऊन भाजपाला पाठींबा देतील असे म्हटले जात असताना मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की आम्ही काही अमित शाह यांना कमिटमेंट वगैरे दिलेली नाही. खरं सांगायचं म्हणजे या गृहस्थाशी माझी ओळख देखील नव्हती. एकदा अहमदाबादला गेलो होतो. तिथे नागरी सहकारी बँकांची बैठक होती. तिथे एका बँकेचे संचालक म्हणून त्यांची मला ओळख करून देण्यात आली. त्यापलिकडे माझी त्यांची काही स्पेशल ओळखही नव्हती असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
अमित शाह यांनी शिर्डी येथील अधिवेशनात विरोधी पक्षातील गद्दारांना धडा शिकविला असून पुन्हा अशी गद्दारी कोणी करणार नाही असे म्हटले आहे यावर प्रतिक्रीया देताना शरद पवार म्हणाले की शाह यांची टीका माझ्या काही जिव्हारी लागली नाही. जिव्हारी लागली अशी नोंद घेणारी ती व्यक्तीही नाही. त्यांची ती लेव्हल नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी या लोकांची भूमिका वेगळी दिसत होती. निकाल काय लागला माहीत आहे? ना त्यांच्या पक्षाने विधानसभेत अधिक काळजी घेतली. ही गोष्ट मान्य केली. मी जाहीरही बोललो.
अमित शाह यांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणात जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की त्यांना माहीत नाही. या देशात प्रोडक्शनचे रेकॉर्ड माझ्या काळातील आहे. मी कृषीमंत्रीपद सोडलं तेव्हा भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता. तांदूळ निर्यात करणारा भारत जगातील सर्वात मोठा देश होता. हार्टिकल्चरमध्येही भारत सर्वात मोठा देश होता. पण अनपढ लोकांना काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे हे लोक बरळतात. तिकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.