नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात छेडलेल्या आंदोलनाला (AMU Hostels Anti-Citizenship Act Protest) हिंसक वळण लागलं. शेकडो विद्यार्थी रविवार संध्याकाळपासून रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. अखेर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढल्याने परिस्थिती चिघळली होती. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत बसची जाळपोळ केली.
जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना दुखापत झाली. त्यानंतर एएमयूच्या विद्यार्थ्यांनी हल्लाबोल केला.
एएमयूच्या विद्यार्थ्यांनी बाबे सर सय्यद गेटवर जमून दिल्लीतील प्रकाराच्या निषेधार्थ कायदा आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व गेट सील करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. इथेही पोलिसांना अश्रूधूर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला. यामध्ये काही पोलिस जखमी झाल्याचीही माहिती आहे.
अलिगड मुस्लिम विद्यापीठातील हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती रजिस्ट्रार अब्दुल हमीद यांनी दिली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने 5 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टया जाहीर केल्या आहेत. पोलिस रविवारी रात्री एएमयूच्या कॅम्पसमध्ये शिरल्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांचे खटके उडाले.
नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत गाड्या, बसेसची जाळपोळ
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अलिगड शहरात 16 तारखेच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा प्रतिबंधित करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जामिया मिलिया विद्यापीठातील 50 विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आलं आहे. आंदोलन छेडल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
MS Randhawa, PRO Delhi Police: All detained students have been released from Kalkaji and New Friends Colony. pic.twitter.com/1Plzfp3tfV
— ANI (@ANI) December 15, 2019
एएमयूच्या विद्यार्थ्यांना पुढील सोमवार (23 डिसेंबर) पासून हिवाळी सुट्टी जाहीर झाली होती. मात्र सद्य परिस्थिती लक्षात प्रशासनाने एक आठवडा आधीच (16 डिसेंबरपासून) सुट्टी दिली. पाच जानेवारीपर्यंत अलिगढ मुस्लिम विद्यापीठ बंद राहील.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्यास त्यांनी जनतेला (AMU Hostels Anti-Citizenship Act Protest) सांगितलं आहे.