नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi to address nation) देशाला संबोधित करण्यासाठी आले आणि खळबळ उडवणारी घोषणा त्यांनी केली. मोदींनी त्यावेळी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. आता पुन्हा एकदा 8 तारीख आणि रात्री 8 च्या मुहूर्तावर मोदी देशाला संबोधित (PM Modi to address nation) करणार आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्यानंतर पहिल्यांदाच मोदींचं संबोधन आहे. यामध्ये पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेवर मोदी काय बोलतात त्याकडे देशच नव्हे, तर जगाचं लक्ष लागलंय.
मोदी सरकारने कलम 370 काढत जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक संसदेत मंजूर केलं, ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. पाकिस्तानला हा निर्णय रुचलेला नाही. पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानने या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलाय. त्यामुळे मोदींच्या संबोधनाला आता मोठं महत्त्व प्राप्त झालंय.
जम्मू काश्मीर आणि उर्वरित देश यांच्यात वेगळं नातं निर्माण करणारं कलम 370 काढल्यानंतर जम्मू काश्मीरचा विकास हे आता पुढचं ध्येय असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मोदी त्यांचं काश्मीर व्हिजनही सांगू शकतात. शिवाय हा देशांतर्गत मुद्दा असल्याची भूमिका भारताने अगोदरपासूनच घेतली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या निर्णयाबाबत एकाही मोठ्या देशाने प्रतिक्रिया दिलेली नाही.
काश्मीर प्रश्नी अमेरिकेने आपल्याला मदत करावी, अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान ज्या देशासोबतच्या मैत्रीचं उदाहरण जगासमोर मांडत होता, त्या चीननेही कलम 370 च्या निर्णयावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनकडून भारतावर दबाव टाकला जाईल, असा पाकिस्तानचा अंदाज होता. पण तसं काहीही झालं नाही. उलट चीनने मानसरोवर यात्रेचा व्हिजा दरवर्षीप्रमाणे भाविकांना दिला जाईल, असंही जाहीर केलंय. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे संबंधच तोडण्याचा निर्णय घेतला.