लॉकडाऊनची मुदत वाढणार नाही, अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचा दावा, तासाभरात ट्वीट डिलीट

| Updated on: Apr 02, 2020 | 2:55 PM

15 एप्रिलनंतरही जमावबंदीचे कलम 144 लागूच राहणार आहे, असा दावाही अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी केला होता. (Pema Khandu claim on Lock down)

लॉकडाऊनची मुदत वाढणार नाही, अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचा दावा, तासाभरात ट्वीट डिलीट
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत वाढणार नाही, असा दावा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवरुन केला होता. मात्र एका तासात त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Pema Khandu claim on Lock down)

देशातील संचारबंदी आणि लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र 15 एप्रिलनंतरही सोशल डिस्टन्सिंग राखावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं पेमा खांडू यांनी सांगितलं होतं. 15 एप्रिलनंतरही जमावबंदीचे कलम 144 लागूच राहणार आहे, असा दावाही पेमा खांडू यांनी केला होता.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे मोदींसोबत बसलेल्या मंत्री-अधिकाऱ्यांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचं दिसलं.

‘आताच युद्धाला सुरुवात झाली आहे. कोणतीही चूक होऊ देऊ नका. दर 24 तासांनी आपण सावध असले पाहिजे. ‘कोरोना’चा उद्रेक थांबवण्यासाठी आपण एकत्रितपणे लढायला पाहिजे’ असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती खांडू यांनी ट्विटरवर दिली आहे. पेमा खांडू यांनी एकामागून एक अशी सहा ट्वीट केली होती, परंतु लॉकडाऊनच्या मुदतीविषयी भाष्य करणारं ट्वीट त्यांनी काही मिनिटांत डिलीट केलं.

‘हा लढा आपल्या प्रत्येकाने लढायला हवा. या युद्धात आरोग्य कर्मचारी, पोलिस किंवा सरकारला एकट्याने सोडले जाऊ शकत नाही. मानवजातीच्या शत्रूचा पराभव करण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येण्याची वेळ आता आली आहे’ असंही मोदी म्हणाले. (Pema Khandu claim on Lock down)

हेही वाचा : लॉकडाऊन आणि कोरोनाचं संकट, डॉ. आंबेडकर जयंतीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

‘आता कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याची वेळ आली आहे. आपण मदतीची पॅकेजेस घोषित करण्याची स्पर्धा नको करुयात. आपल्या सर्वांनी वास्तववादी आणि व्यावहारिक असणे आवश्यक आहे. हा संघर्ष कितीही लांबू शकतो आणि पुढे काय वळणं येतील, हे आपण सांगू शकत नाही’ असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं पेमा खांडू म्हणतात.

‘लॉकडाऊनची मुदत 15 एप्रिल रोजी समाप्त होईल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही रस्त्यावरुन मुक्त संचार कराल. आपण सर्वजण जबाबदारपणे वागलं पाहिजे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग हे लढण्याचे एकमेव मार्ग आहेत’ असं मोदींनी सांगितल्याचं खांडू लिहितात.

हेही वाचा : 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

’21 दिवसांचा लॉकडाऊन वाया जाऊ देऊ नका. लॉकडाऊननंतरही मास्क घालणे, स्वच्छता करणे, अंतर राखणे अशा कोरोना प्रतिबंधक सुरक्षा उपायांचे पालन करा. जबाबदार राहणे आपले रक्षण करेल’ असं आवाहन मोदींनी केल्याची माहिती आहे.

‘कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शून्य बजेट लागणार आहे. आपण सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवू शकत असाल, तर कोविड19 वर विजय मिळवणे शक्य असल्याचंही मोदी म्हणाले. (Pema Khandu claim on Lock down)

‘लॉकडाऊन वाढवण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. असे अहवाल वाचून मला आश्चर्य वाटले’ अशी प्रतिक्रिया कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.