मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : अशोक चव्हाण हे दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच बाहेर पडण्याची, काँग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काल काँग्रेसमधून बाहेर पडले. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
२ वर्षांआधीच सोडणार होते पक्ष
अशोक चव्हाण हे आत्ताच नव्हे तर गेल्या काही काळापासूनच पक्ष सोडण्यासाठी धडपडत आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाच चव्हाण यांचीही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची धडपड सुरू होती. आता त्यांना बाहेर पडायला मुहुर्त मिळाला असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.
अशोक चव्हाण स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत
अशोक चव्हाण यांनी स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. जनता तुमच्यावर थुंकत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं तसेच भाजपवरही टीका केली.