इस्लामाबाद : ख्रिश्चन महिला आसिया बीबीची पाकिस्तानमधून अखेर दहा वर्षांच्या वनवासानंतर सुटका करण्यात आली आहे. आसिया बीबीवर पाकिस्तानमधील ब्लास्फमी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. आसिया बीबी आता कॅनडात दाखल झाल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलंय. आसिया बीबीची पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सहा महिन्यांपूर्वी सुटका केली होती. त्यानंतर तिला विविध देशांकडून नागरिकत्व देण्यासाठी ऑफर आली होती, ज्यात कॅनडाचाही समावेश होता.
पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनीही सूत्रांच्या हवाल्याने आसिया बीबीने पाकिस्तान सोडलं असल्याचं वृत्त दिलंय. पण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अजूनही वृत्ताला दुजोरा दिला नाही. आसिया बीबीच्या सुटकेचे निर्देश दिल्यानंतर कट्टर मुस्लीम संघटनांनी पाकिस्तानमध्ये दंगली केल्या होत्या. शिवाय तिला पाकिस्तानमधून कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला होता.
कोण आहे आसिया बीबी?
ख्रिश्चन असलेल्या आसिया बीबीसाठी संपूर्ण जगभरातून पाठिंबा निर्माण झाला होता. तिला पाकिस्तानमधील अत्यंत सुरक्षित आणि कुणालाही माहित नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. नोव्हेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पाकिस्तान सरकारशी बातचीत करुन आसिया बीबीच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.
आसिया बीबी ही एक शेतकरी महिला आहे. मुस्लीमविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करत तिला तुरुंगात टाकण्यात आलं आणि 2010 मध्ये तिला दोषी ठरवलं गेलं. केवळ मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण ऑक्टोबर 2018 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सबळ पुराव्यांअभावी तिची सुटका केली. तिच्यासोबत शेतात काम करणाऱ्या महिलांनी आसिया बीबीवर हा आरोप केला होता, ज्यानंतर तिला अटक करण्यात आली.
आसिया बीबीला चार मुलं आहेत. पण कुटुंबापासून दूर ठेवलेल्या आसिया बीबीचे गेल्या दहा वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात प्रचंड हाल करण्यात आले. आपण कधीही मुस्लीमविरोधी वक्तव्य केलं नसल्याचं आसिया बीबी वारंवार सांगत राहिली. पण पाकिस्तानमधील कट्टरपंथी संघटनांच्या दबावामुळे सरकारने तिच्यावर ब्लास्फमी कायद्यांतर्गत कारवाई केली.
आसिया बीबी प्रकरण समोर येताच जगभरातील ख्रिश्चन समुदायाने पाकिस्तानविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तिची तातडीने सुटका करण्याची मागणी केली. धक्कादायक म्हणजे पाकिस्तानमधील दोन नेत्यांनी तिची मदत करण्याचा प्रयत्न केला होता, पण या नेत्यांची कट्टरपंथी संघटनांनी हत्या केली. पंजाब प्रांताच्या राज्यपालांना त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने गोळी घातल्या होत्या. आसिया बीबीला न्याय मिळावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.