विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडल्यानंतर त्यांना मारहाण करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाल सत्र न्यायालयाने दोषी ठरवित तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकारचा गुन्हा हा समाजाघातक असून अशा प्रकारच्या वृत्तीला अद्दल घडविण्यासाठी ही शिक्षा दिल्याचे सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या आरोपीने केले कृत्य पहाता तो कोणतीही दया दाखविण्याच्या पात्र नसल्याचे न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले आहे.
नवी मुंबईतील टीकू मोहम्मद खान याला तीन वर्षांपूर्वी 18 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सीवूड रेल्वे स्थानकावर टीसीने विनातिकीट प्रवास करताना पकडले होते. टीकू याच्याकडे जेव्हा ओळखपत्राची मागणी केली तेव्हा त्याने दोन ओळखपत्रे सादर केली. आधारकार्डावर त्याचे टिंकू मोहम्मद ( वडील मोहम्मद कय्युम ) , रा.पत्ता: सीबीडी बेलापूर, नवी मुंबई असा पत्ता होता. तर निवडणूक ओळखपत्रावर रिंकु मोहम्मद कय्युम, ( वडील मोहम्मद कय्युम ) रा.पत्ता: ठाणा चंद्रा तेहसील लंबुवा, जिल्हा सुल्तानपूर असा होता. टीसीला संशय आल्याने प्रवाशाला रेल्वे पोलिस चौकीत नेले.
टीसीने त्याला पकडून चौकीत नेतेवेळी आरोपी तरुणाने टीसीला शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे सुरु केले. पोलिस कॉन्स्टेबल यांनी धावत येऊन या तरुणाच्या तावडीतून या टीसीची सुटका केली. या गुन्ह्याचे स्वरुप पाहाता अशा प्रकारे अधिकृत तिकीट न काढता प्रवास करणे हा तर अपराध आहेत.आरोपी वैध तिकीट, रेल्वे पास किंवा प्लॅटफॉर्म तिकीट न घेता रेल्वेच्या मालमत्तेचा गैरवापर केला आहे आणि त्याबाबत टीसीने चौकशी केली असता आरोपींनी टीसीला शिवीगाळ तर केलीच पण गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्यही करण्याचे धाडसही केले.अशा प्रकारे पब्लिक सर्व्हंटला त्याचे अधिकृत कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे. अशा परिस्थितीत आरोपीचे वय आणि त्याने आपल्या ताकदीचा केला चुकीचा वापर लक्षात घेता त्याच्याविषयी कोणताही दया दाखविणे योग्य नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.