न्यूयॉर्क : येत्या शुक्रवारी पृथ्वीच्या कक्षेजवळून एक अवाढव्य लघुग्रह (Asteroid) जाणार आहे. अमेरिकेतील एम्पायर स्टेट (Empire State) बिल्डिंग म्हणजेच 1454 फूटांपेक्षा उंच असा हा लघुग्रह असल्याची माहिती आहे. अॅस्टरॉईड (Asteroid 2006 QQ23) हा दहा ऑगस्टला ताशी 16 हजार 740 किलोमीटर वेगाने निघून जाईल. त्यामुळे वैज्ञानिकांनी हा ‘पृथ्वीसाठी संभाव्य धोका’ (potentially hazardous) असल्याचं म्हटलं आहे.
या लघुग्रहाचा व्यास 569 मीटर असल्याची माहिती आहे. पृथ्वीच्या 0.049 खगोलीय एकक जवळून (astronomical units of Earth) किंवा 7.4 मिलियन म्हणजेच 74 लाख किलोमीटर अंतरावरुन हा लघुग्रह ‘पास होईल’. (1 astronomical unit म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर)
0.049 खगोलीय एकक हे अंतर खगोलशास्त्राच्या दृष्टीने निकटचे असल्यामुळे लघुग्रहापासून पृथ्वीला संभाव्य धोका असल्याचं म्हटलं आहे. अर्थात हा लघुग्रह थेट पृथ्वीवर आदळणार नाही, त्यामुळे आपण घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही.
‘नासा’ (NASA) च्या ‘प्लॅनेटर डिफेन्स को-ऑर्डिनेशन’ पेजवर या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. काही मीटर आकारमानाचे ‘लहान लघुग्रह’ पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेतून निघून जाताना महिन्यातून अनेक वेळा आढळतात. लघुग्रह किंवा धूमकेतू (comets) यांचे लहान तुकडे पृथ्वीच्या वातावरणात आदळून दररोज स्फोट होतात. यामुळे रात्रीच्या वेळेस कधी उल्का (meteor) ही दिसतात. तर कधी त्यांचे अवशेषही जमिनीवर पडतात.
अॅस्टरॉईड 2006 QQ23 च्या आकाराच्या सहा अवकाशीय वस्तू दरवर्षी पृथ्वीजवळून जातात. ‘नासा’च्या माहितीनुसार सद्यस्थितीत पृथ्वीजवळ एक किलोमीटरपेक्षा जास्त आकारमानाच्या 900 अवकाशीय वस्तू आहेत. मात्र माहितीत असलेल्या एकाही लघुग्रहापासून पृथ्वीला येत्या शंभर वर्षात धोका नाही.
पृथ्वीला जो ‘सर्वात मोठा’ संभाव्य धोका आहे, तो ही अत्यल्प असल्याचं नासा सांगतं. लघुग्रह 2009 FD पासून 2185 साली धोक्याची शक्यता आहे, ती केवळ 0.02 टक्के. त्यामुळे लघुग्रहापासून आपल्याला इतक्यात तरी कोणताही थेट धोका नाही.