नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले (Mahatma Phule) समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अंबादास गारूडकर, अॅड.सुभाष राऊत, तुकाराम बिडकर यांच्यासह प्रा.दिवाकर गमे यांची वर्णी लावण्यात आली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक मुंबई (Mumbai) येथे पार पडली. सदर बैठकीत कार्यकारिणी बाबत चर्चा होऊन कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहे.
अंबादास गारूडकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत करण्यात आलेल्या बदलानुसार प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्याकडे कोकण विभागातील ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारूडकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दिवाकर गमे यांच्याकडे नागपूर विभागाची जबाबदारी
त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांच्याकडे मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबादची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम बिडकर यांच्याकडे विदर्भ विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीमची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्ष प्रा.दिवाकर गमे यांच्याकडे नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
नाशिक पूर्व जिल्हाध्यक्षपदी डॉ.योगेश गोसावी तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांची नियुक्ती
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरे व उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी संतोष डोमे यांची वर्णी लागल्याने नाशिक पूर्व जिल्हाध्यक्षपदी डॉ.योगेश गोसावी तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे व उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.