ठाणे : शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे शिवसेनेची युवक आघाडी असलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलीस गाडीतून खेचून मारहाण झाल्याची घटना घडली (Attack on Yuvasena leader). हर्षल गायकर असं पीडित युवासेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते आपल्या कुटुंबीयांसोबत वाशिंद येथील भातसई गावात गेला असताना हा हल्ला झाला.
कल्याणमध्ये राहणारे हर्षल गायकर आपला भाऊ विराज गायकर याच्यासोबत आजी आजोबांना प्रसाद देण्यासाठी वाशिंद येथील भातसई गावात गेले होते. हर्षल गायकर शहापूरचे युवासेना उपतालुका प्रमुख आहेत. आजी आजोबांना प्रसाद देऊन कल्याणच्या दिशेने परतत असताना जुन्या वादाचा राग मनात ठेऊन आरोपी अशोक जाधव याने त्याच्या साथीदारांसोबत हर्षल आणि विराजवर प्राणघातक हल्ला केला.
दोन गटात हाणामारीची माहिती मिळताच वाशिंद पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जखमी हर्षल आणि विराज यांना पोलीस गाडीत बसवलं. यावेळी आरोपी अशोक जाधवच्या गटाने पोलिसांच्या गाडीला घेराव घालत जखमी अवस्थेतील हर्षल आणि विराज या दोघांना गाडीतून खेचून पुन्हा जबर मारहाण केली. यात हर्षल, त्याचा भाऊ विराज आणि आजोबा जखमी झाले. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
वासिंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. जखमीवर कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या उपस्थितीतही झालेल्या या गुंडागिरीनंतर कल्याण परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आरोपींवर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.