नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेची राफेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम फ्रान्समध्ये कार्यरत आहे. या टीमच्या कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना फ्रान्सच्या पॅरिसमधील एका उपनगरात रविवारी रात्री घडली. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतची माहिती दिली. भारतीय वायू सेनेची ही टीम फ्रान्समध्ये तयार होत असलेल्या 36 राफेल विमानांच्या निर्मिती आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचं निरीक्षण करत आहे. वायू सेनेने या घटनेबाबत भारतीय संरक्षण विभागाला कळवलं आहे. या घुसखोरीचं लक्ष्य राफेलची महत्त्वपूर्ण माहिती चोरी करण्याचं असावं, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Sources: Attempted break in Indian Air Force Rafale Project Management Team in a suburb of Paris in France on Sunday night. Indian team in France headed by a Group Captain rank officer to oversee the 36 Rafale aircraft production & training of Indian personnel there. 1/2 pic.twitter.com/9fOKDESjM8
— ANI (@ANI) May 22, 2019
एएनआयनुसार, वायू सेनेने या घुसखोरीबाबत संरक्षण मंत्र्यालयाला कळवलं आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राफेल विमानं सप्टेंबर 2019 पासून भारतात येतील. या राफेल डीलवर काँग्रेसने भाजप सरकारवर अनेक आरोप केले. या मुद्यावरुन अनेकदा विरोधक आक्रमकही झाले. लोकसभा निवडणुकांमध्येही राफेल डीलचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. एकीकडे विरोधकांनी या मुद्यावरुन भाजपवर आरोप केले. दुसरीकडे, भाजपने मात्र हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं सांगितलं. राफेल डीलचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निर्णय देत विरोधकांना धक्का दिला.
राफेलचं वैशिष्ट्य काय?
राफेल एक असं लढाऊ विमान आहे जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतो. राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे. हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो. यामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
राफेल विमान करार
मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता.
संबंधित बातम्या :
18 च्या किंमतीत 36 विमानं मिळतायत, गैरव्यवहाराचा संबंधच नाही : दसॉल्ट
राफेल करार कसा झाला? सरकारने सुप्रीम कोर्टात ए टू झेड सांगितलं!