औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित गर्भवतीने जन्म दिलेल्या बाळाला ‘कोरोना’ची लागण झालेली नाही. या आनंदवार्तेने महिलेच्या कुटुंबासह आरोग्य यंत्रणेनेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. (Aurangabad Corona Positive Pregnant woman delivers baby)
औरंगाबादमध्ये गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. अवघ्या काही दिवसांपूर्वीच गर्भवतीचे ‘कोरोना’ रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. तिचे नऊ महिने भरत आल्यामुळे महिलेच्या कुटुंबासह डॉक्टर-नर्स यांनाही काळजी लागली होती.
घाटी रुग्णालयात काल (शनिवार 18 एप्रिल) या महिलेची डिलेव्हरी झाली. कोरोनाबाधित महिलेने मुलीला जन्म दिला. बाळाला उचलून घेण्यासाठी आई आसुसली होती, मात्र संसर्गाचा भीतीने माऊलीने आपल्या इच्छेला मुरड घातली.
प्रसुतीनंतर बाळंतीण आणि बाळ यांची प्रकृती सुखरुप होतीच, परंतु आईकडून बाळाला संसर्ग झाला नसेल ना, याची सर्वांना चिंता लागून राहिली होती. नवजात बालिकेचे नमुने स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. कोरोनाबाधित महिलेने बाळाला जन्म देण्याची देशातली ही तिसरी घटना असल्याची माहिती डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दिली होती.
बाळाचे ‘कोरोना’ अहवाल आज निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागात आनंदाची लाट पसरली. पुढचे काही दिवस बाळाला आईपासून दूर ठेऊन संगोपन केलं जाणार आहे. आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर चिमुकलीला आईकडे सोपवलं जाणार आहे.
औरंगाबादमध्ये 29 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. यापैकी 5 जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. तर तिघांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत. (Aurangabad Corona Positive Pregnant woman delivers baby)
पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडीhttps://t.co/ixBBdxFhOa#Palghar #Murder #MobLynching #Police
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 19, 2020
राज्यात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 11 बळी गेले, तर एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 328 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रात आता 3 हजार 648 कोरोनाग्रस्त असून राज्यातल्या ‘कोरोना’बळींची संख्या 211 वर गेली आहे. राज्यात काल 34 रुग्ण बरे झाले असून एकूण 365 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 हजार 468 कोरोना टेस्ट झाल्या असून 63 हजार 476 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
पुण्यात काल सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली. पु्ण्यात काल 78 नवे रुग्ण सापडले. पुण्यातली एकूण रुग्णसंख्या आता 612 वर गेली आहे. पुण्यात काल ‘कोरोना’मुळे एक रुग्ण दगावला.
देशभर काल ‘कोरोना’चे 1 हजार 376 नवे रुग्ण सापडले. भारतात काल 53 ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण दगावले. देशात एकूण 15 हजार रुग्णांचा टप्पा पार झाला आहे. भारतात 507 रुग्णांनी आतापर्यंत प्राण गमावले आहेत.
(Aurangabad Corona Positive Pregnant woman delivers baby)