औरंगाबाद: जगप्रसिद्ध ऑडी कारचे उगमस्थान असलेले जर्मनीतील इंगोलस्टॅट (Ingolstat) आणि औरंगाबाद शहर आता सिस्टर सिटी (Sister city) म्हणून भविष्यात काम करणार आहेत. यांसदर्भातील सामंजस्य करार नुकताच करण्यात आलाय या करारामुळे दोन्ही शहरात औद्योगिक , सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापार, पर्यटन क्षेत्रात आदानप्रदान होणार असल्याचे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. औरंगाबादकडून मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय आणि इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. ख्रिस्तियन श्राफ यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यातर्फे गेल्या वर्षभरापासून जर्मनी मधील इंगोलस्टॅट शहरसोबत ट्वीन सिटी अग्रीमेंट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी द्वारे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. शुक्रवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून इंगोलस्टॅटचे महापौर डॉ ख्रिस्तियन श्राफ, उपमहापौर डॉ. दोरोथे डेनेके, इंगोलस्टॅटचे शिक्षण आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख गॅब्रीएल एंजर्ट, सांस्कृतिक विभागाच्या क्रिस्टिना दिएडरीच, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या विभाग प्रमुख ब्रिगीट स्टॉकल, मेलानी कुनेल, म्युनिक जर्मनीसाठी भारताचे कौन्सिल कौन्सिलेट जर्नल डॉ. सुयश चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, ऑरीकचे व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक उपस्थित होते.
या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅटचे संबंध वृध्दिंगत होतील. भारत आणि जर्मनी, महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्या संबंधांवर देखील याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅट या दोन शहरांदरम्यान शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात भागिदारीच्या संधी निर्माण होतील. शहरांमध्ये स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल. जोपर्यंत दोन्ही शहरांचा प्रतिसाद मिळत राहील, तोपर्यंत हा करार अबाधित असेल. या कराराला कुठलीही कालमर्यादा नाही, असे श्री पाण्डेय म्हणाले.
इंगोलस्टॅटचे महापौर डॉ ख्रिस्तियन श्राफ यांनी या भागीदारी बद्दल मत व्यक्त करत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यांच्या शहराबद्दल माहिती देत औरंगाबादसोबत शहरासोबत भागिदारी करण्यास प्रोत्साहन दिले. या करारामुळे दोन शहरातील शाळा, महाविद्यालये भागिदारी करून स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्रॅम सारख्या संकल्पना राबवू शकतील. लवकरच यावर काम करू, असे देखील ते यावेळी म्हणाले. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या करारासाठी दोन्ही शहरांना शुभेच्छा देत हा करार शहरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे सांगितले. या करारामुळे दोन्ही शहरांत संकल्पनांची देवाणघेवाण होईल, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल, शहराचा विकास होईल आणि नागरिकांना नव्या कल्पना आणि नवे अनुभव मिळतील असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी इंगोलस्टॅटच्या टीमला औरंगाबादला येण्याचे आमंत्रणदेखील दिले. मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. सुयश चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन शहरांना जोडणे शक्य झाले. गेल्या वर्षभापासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनामुळे हा करार पुढे ढकलला गेला. आज अथक प्रयत्नांनंतर या करारावर दोन्ही शहरांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त आणि स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटी चे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनिकर, सीआयआय चे राज्य अध्यक्ष श्रीराम नारायणन, सी एम आय ए चे प्रमुख शिवप्रसाद जाजू, मसिआचे प्रमुख मनीष अगरवाल, माजी सीआयआयचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी, धूत हॉस्पिटलचे मुख्यप्रशासक हिमांशू गुप्ता, औरंगाबाद स्मार्ट सिटीची टीम यांची उपस्थिती होती.
इतर बातम्या-